पादचारी मार्गावर तब्बल पाऊण किमी लांबीची शेड उभारून पंखे, बेंच आदींची व्यवस्था मात्र स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By धीरज परब | Updated: October 15, 2023 17:53 IST2023-10-15T17:53:30+5:302023-10-15T17:53:48+5:30
रहिवाश्यांनी हि शेड काढून टाकण्याची मागणी पालिके कडे केली आहे .

पादचारी मार्गावर तब्बल पाऊण किमी लांबीची शेड उभारून पंखे, बेंच आदींची व्यवस्था मात्र स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर
मीरारोड- भाईंदर पश्चिमेच्या तब्बल पाऊण किमी लांबीच्या पादचारी मार्गावर चक्क प्लॅस्टिकची शेड उभारून आत पंखे , बसायचे बाकडे , दिवे लावण्याचे काम महापालिकेने केले . मात्र हेच काम येथील रहिवाश्यांच्या सुरक्षिततेवर बेतले आहे . रहिवाश्यांनी हि शेड काढून टाकण्याची मागणी पालिके कडे केली आहे.
भाईंदर पश्चिमेस रेल्वे समांतर गल्ली आहे . त्यावरून काही हजार लोक रोजची ये जा करत असतात . येथील मधू अग्रवाल रुग्णालय ते फाटक पर्यंतच्या सुमारे २ हजार ४०० फूट लांब पादचारी मार्गावर भाजपाच्या एका तत्कालीन नगरसेवकाच्या मागणी वरून महापालिकेने शेड उभारली . त्या लांब लचक शेड मध्ये लोकांना बसायला बाकडे बसवले गेले . मोठ्या संख्येने पंखे व वीज दिवे लावले गेले.
वास्तविक शासन आदेशा नुसार नगरसेवक निधी मधून असे काम करण्याची तरतूद नाही . शिवाय महत्वाची लांब गल्ली नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोकळी ठेवणे आवश्यक होते . शेड उभारल्याने त्याखाली गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे . गर्दुल्ले , उनाड, नशा करणारे वा अन्य अनोळखी हे बाकड्यांवर पडलेले असतात . प्रेमी युगुल सुद्धा बाकड्यांच्या आश्रयाला असतात . येथे राहणारे वा ये - जा करणाऱ्या लोकांना गर्दुल्ले , नशेडी , चोरटे यांची भीती वाटत असते . महिला व मुलींना असुरक्षित वाटते . त्यातच शेडच्या पत्र्यावर चढून चोरटे हे लगतच्या इमारतीतील घरां मध्ये घुसून घरफोड्या करत आहेत . अनेक घरां मध्ये चोऱ्या झाल्या आहेत . तर घरात घुसणाऱ्या चोरट्यां मुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे येथील रहिवासी सांगतात.
येथील तपस्या , सालसार पार्क , श्री पार्श्व पूजा , नवकार , भीमनाथ , पशुपतीनाथ , बाबुलनाथ , भाईंदर त्रिशूल , शांती नगर , इंदिरा कॉम्प्लेक्स , देव दर्शन ह्या इमारतींसह तेथील रुग्णालय , खाजगी क्लासचालक आदींनी पत्रं दिली आहेत . महापालिका व पोलिसां सह येथील भाजपचे माजी नगरसेवक, आमदार गीता जैन आदीं ना भेटून शेड काढून टाकण्याची मागणी चालवली आहे . मात्र कोणी दाद देत नसल्याने रहिवाश्यांनी नुकतीच खासदार राजन विचारे यांच्यासह आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या . आयुक्तांनी आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले असले तरी खा . विचारे यांनी १० दिवसात शेड काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दया असे निर्देश दिले आहेत.