अर्नाळा किनाऱ्यावर होते रात्रभर बेकायदा रेती उत्खनन
By Admin | Updated: February 15, 2016 02:54 IST2016-02-15T02:54:20+5:302016-02-15T02:54:20+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत.

अर्नाळा किनाऱ्यावर होते रात्रभर बेकायदा रेती उत्खनन
शशी करपे , वसई
गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत. तर समुद्राचा नैसर्गिक बंधारा नष्ट होऊ लागल्याने सुुरुची बागही धोक्यात आली आहे. बेकायदा उत्खनन वेळीच रोखले नाही तर नैसर्गिक बंधारा नष्ट होऊन पावसाळ्यात उधाणाचे पाणी गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अर्नाळा समुद्रकिनारी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किमान शंभर मजूर बेकायदा रेती उत्खनन करतात. त्यानंतर ही रेती गाडीतून शहरात विकली जाते. या धंद्यात अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाला असून त्यांना महसूल आणि पोलीस यंत्रणेची साथ असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बेकायदा रेती उत्खननामुळे समुद्रकिनारी मोठे खड्डे पडले आहेत. भरतीच्या वेळी हे खड्डे पाण्याखाली जातात. याचा अंदाज नसल्याने पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले आहेत. बेकायदा रेती उत्खननाने अर्नाळ्याचा समुद्रकिनारा आता धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षांत किमान तीसहून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीने एक गार्ड कायमस्वरुपी तैनात ठेवला असून गार्ड आणि गावकरी पर्यटकांना वारंवार सूचना देऊन धोकादायक ठिकाणापासून दूर पोहण्याचा सल्ला देत असतात. पण, त्यानंतरही वर्षाला किमान दोन-तीन पर्यटक बुडून मरण पावत आहेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन होत असल्याने सुुरुची झाडे कोलमडून पडू लागली आहेत.
रेतीमाफियांविरोधात गावकरी अधूनमधून कारवाई करीत असतात. रेती काढणारे मजूर आणि रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या जातात. पण, पोलीस आणि महसूल खात्याशी अर्थपूर्ण संंबंध असल्याने थातूरमातूर कारवाई करून सोडले जाते. मध्यंतरी रेतीमाफियांनी विरोध करणाऱ्या काही गावकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले.
उपसरपंच सतीश तांडेल यांच्याविरोधात रेती वाहतूक करणाऱ्या एका गाडीच्या ड्रायव्हरच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला होता.
आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी तांडेल यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला होता पण, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत रेती उत्खननाविरोधात ठराव केले
जात आहेत. पण, त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी हताश झाले आहेत. ग्रामसभेच्या ठरावाची पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
वसईत चोरीची रेती उत्खनन आणि वाहतूक होत नसल्याचा दावा महूसल खात्याकडून केला जात होता. पण, गेल्याच आठवड्यात रेती चोरीप्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी खानीवली येथील तलाठ्याला मुंबई अँटीकरप्शन विभागाने अटक करून महसूल खात्याल सणसणीत चपराक लगावली आहे.