सेना इच्छुकांची भाजपाकडून पळवापळवी
By Admin | Updated: April 25, 2017 00:02 IST2017-04-25T00:02:10+5:302017-04-25T00:02:10+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकारण तापू लागले असून इच्छुकांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे.

सेना इच्छुकांची भाजपाकडून पळवापळवी
राजू काळे / भार्इंदर
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकारण तापू लागले असून इच्छुकांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे. यात शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांना परस्पर पळवण्याची शक्कल भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने लढवल्याने शिवसेनेसह स्वपक्षातही संतापाची लहर उमटू लागली आहे.
भाजपात पक्षांतराची मांदियाळी सुरू झाली असतानाच शिवसेनेतही टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. पक्षप्रवेशासह मतदारांना आपल्या हाती राखण्यासाठी कार्यक्रमांची मेजवानी देण्यासही सुरुवात झाली असताना याच कार्यक्रमांची संधी साधून इच्छुकांचा पक्षप्रवेश उरकला जात आहे.
विशेष म्हणते इच्छा नसतानाही इच्छुकांना जबरदस्तीने आपल्याच पक्षात प्रवेश देण्याचा आततायीपणाचा प्रत्ययही त्यांना येऊ लागला आहे. शिवसेनेने पक्षप्रवेशाचे एकूण पाच टप्पे तयार केले असून त्यातील दोन टप्पे पार पाडले आहेत. तिसरा टप्पा थेट मातोश्रीवर उरकण्यात येणार आहे. आ. प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षप्रवेशाचा सोहळा पक्षप्रमुखांच्याच हस्ते पार पाडण्यात येणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक कमलेश भोईर यांचा समावेश आहे. त्याची कुणकुण लागताच भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी भोईर यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांमार्फत खेळी चालवली आहे. मात्र, भोईर यांना भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही कोणत्याही परिस्थितीत त्यांना पक्षात आणण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
त्यातच, रविवारी भाजपाने मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेच्या मैदानावर कवी संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात भोईर यांचे मुंबईतील मित्र राजेश शर्मा यांचा त्यांच्या समाजातर्फे सत्कार असल्याने राजेश यांनी त्यांना कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. मित्रत्वाच्या नात्याने भोईर कार्यक्रमाला गेले. ते आल्याचे लक्षात येताच त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात येऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी भाजपा आ. राज पुरोहित यांच्या उपस्थितीत भोईर यांच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेला कापडीपट्टा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला भोईर यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन पक्षप्रवेश दिल्याचे घोषित करण्यात आले.