सेना नगरसेवकास ठार मारण्याची धमकी
By Admin | Updated: March 21, 2017 01:41 IST2017-03-21T01:41:00+5:302017-03-21T01:41:00+5:30
शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदन दराडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सेना नगरसेवकास ठार मारण्याची धमकी
कल्याण : शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदन दराडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे दराडे यांना रिव्हॉल्व्हर घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी उगले यांनी महापालिकेचे सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्याकडे केली आहे.
उपमहापौरपदाची १७ मार्चला निवडणूक होती. त्या दिवशी दराडे महापालिका मुख्यालयात आले. पण, त्यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर सुरक्षारक्षकांकडे जमा केले नाही. दराडे यांनी उगले यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांच्याकडून उगले यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे दराडे यांना महापालिका मुख्यालयात रिव्हॉल्व्हर घेऊन प्रवेश देऊ नये. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तसा अहवाल खेर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना द्यावा. महापालिकेत उगले यांच्यावर हल्ला झाल्यास त्याला महापालिकेचे सुरक्षारक्षक जबाबदार असेल, असे उगले यांनी सांगितले. याप्रकरणी उगले, शिवसेना नगरसेवक विद्याधर भोईर, भाजपा नगरसेवक विशाल पावशे, शिक्षण मंडळाचे सभापती दया गायकवाड यांनी खेर यांची भेट घेतली. दराडे रिव्हॉल्व्हर घेऊन आले. त्यांनी रिव्हॉल्व्हर जमा केले नाही. त्याची साधी तपासणीही सुरक्षारक्षकांनी का केली नाही, असा जाब या सदस्यांनी खेर यांना विचारला आहे. (प्रतिनिधी)