अंत्यविधी महामार्गावर?
By Admin | Updated: March 24, 2017 01:10 IST2017-03-24T01:10:13+5:302017-03-24T01:10:13+5:30
घोलप-मानिवली येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने येथे अंत्यसंस्कार थेट महामार्गावर करावे लागतात.

अंत्यविधी महामार्गावर?
टोकावडे : घोलप-मानिवली येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने येथे अंत्यसंस्कार थेट महामार्गावर करावे लागतात. मानिवली येथील शेतकरी कांताराम दुंदा घोलप यांची आई यमुनाबाई दुंदा घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने त्यांचेही अंत्यसंस्कार गुरूवारी रस्त्यावरच झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती काळ मृतदेहाची अशी परवड किंवा विटंबना होणार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
वास्तविक, या गावात ५५ वर्षांपूर्वी एक स्मशानभूमी होती. पण, ती एका कुटुंबाच्या मालकी हक्काच्या जागेत होती. येथील ताराबाई घोलप यांचीच ही जागा असून आता त्या तेथे अंत्यविधीसाठी मनाई करत असल्याने ग्रामस्थांना स्वत:च्या शेतात किंवा रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. आता मात्र, तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मानिवली गावातील लोकांची अत्यविधाची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)