साहित्यासाठी उपकर लावा
By Admin | Updated: August 31, 2016 03:03 IST2016-08-31T03:03:24+5:302016-08-31T03:03:24+5:30
भाषा आणि साहित्यासाठी एखादा उपकर लावल्यास काय हरकत आहे. मराठी माणूस किमान देणगी तरी साहित्य मंडळासाठी देऊ शकेल.

साहित्यासाठी उपकर लावा
बदलापूर : भाषा आणि साहित्यासाठी एखादा उपकर लावल्यास काय हरकत आहे. मराठी माणूस किमान देणगी तरी साहित्य मंडळासाठी देऊ शकेल. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा साहित्य संमेलन हे काही जणांसाठी व्यवसाय होईल अशी परखड टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली.
एका कार्यक्रमानिमित्ताने ते आले होते. तेव्हा मराठी स्वायत्त विद्यापीठास भेट दिली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. काही वर्षात साहित्य महामंडळाचे काम साहित्य संमेलनापुरते केंद्रीत झाल्याने मराठी माणसांशी त्यांचा संवाद होत नाही. मराठी माणूसही साहित्य मंडळासाठी काहीही करत नाही. त्यामुळे आमच्याप्रमाणे मराठी माणूसही साहित्य महामंडळाच्या अधोगतीसाठी जबाबदार आहे असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
दिवसेंदिवस साहित्य संमेलनाचा वाढत जाणारा खर्च हा चिंता करण्यासारखा आहे. लेखक आणि आमंत्रितांनी स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि मानधन घेणे जरी टाळले तरी संमेलनाचा खर्च ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. त्यात महामंडळाची आर्थिक स्थिती बेताची होण्यास ज्याप्रमाणे मंडळ जबाबदार आहे, त्याचप्रमाणे प्रकाशक, मराठी माणूसही असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाशक आपला उदरिनर्वाह मराठी साहित्याच्या भरवशावर करतात. मात्र साहित्य संमेलनासाठी किंवा महामंडळाला त्यांनी आर्थिक मदत केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगून राजाश्रय घेण्यामागे ही सर्व मंडळीही जबाबदार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकारने मंडळ स्थापन केले. मात्र त्याचा निधी अनेक वर्षापासून वाढताना दिसत नाही. खर्चाचे प्रमाण वाढलेले असताना फक्त २५ लाखात संमेलन शक्य नाही. १२ कोटी महाराष्ट्रातील साहित्य चळवळीसाठी फक्त २५ लाख पुरे पडणार नाहीत असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)