संमेलन आयोजकांचाही माफीनामा
By Admin | Updated: April 23, 2017 04:04 IST2017-04-23T04:04:25+5:302017-04-23T04:04:25+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेला विरोध असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदार, नगरसेवक व नेत्यांचा सावरकर साहित्य संमेलनाच्या

संमेलन आयोजकांचाही माफीनामा
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेला विरोध असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदार, नगरसेवक व नेत्यांचा सावरकर साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीमध्ये पूर्वपरवानगी न घेता समावेश करण्यामुळे आता या मंडळींची पत्राद्वारे जाहीर माफी मागण्याची नामुश्की संमेलन आयोजकांवर आली आहे. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यासारख्या नेत्यांची संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांच्यासह काही वक्त्यांकडून संमेलनात निंदानालस्ती होत असताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा स्वागत समितीमध्ये समावेश करून त्यांना निमंत्रित करणे, ही सावरकर यांच्या विचारांशीदेखील प्रतारणा असल्याची टीका संमेलनाला हजर असलेले सावरकरप्रेमी आणि संमेलनापासून चार हात दूर असलेले गांधी-नेहरूप्रेमीही करू लागले आहेत.
एकोणतिसावे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन शुक्रवारपासून ठाण्यात सुरू झाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानिमित्ताने तयार केलेल्या स्वागत समितीमध्ये भाजपा, शिवसेना नेत्यांसोबत आ. जितेंद्र आव्हाड यांचे नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आव्हाड यांचा सावरकरांच्या विचारधारेला असलेला विरोध सर्वश्रुत असून सावरकरवादी आणि भाजपाचे उजव्या विचारसरणीचे अनेक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार यांच्या डोळ्यांत आव्हाड यांची आक्रमकता खुपत असते. याबाबत, आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की, संमेलनाचे आयोजक रवींद्र साठे यांच्याशी संपर्क करून आपण याबद्दल नापसंती व्यक्त केली. त्यावर, संमेलनाला गर्दी व्हावी, याकरिता सर्व लोकप्रतिनिधींची नावे प्रसिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांचे जहाल हिंदुत्ववादी विचार मानणाऱ्या प्रवृत्तींशी आपण राजकीय लढाई लढत असताना आपली पूर्वपरवानगी न घेता स्वागत समितीमध्ये आपले नाव घुसडणे, हे चुकीचे असून त्याबद्दल आयोजक माफीनाम्याचे पत्र मला देणार आहेत.
आयोजक रवींद्र साठे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना स्वागत समितीमध्ये समाविष्ट होण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. संमेलनाचे अन्य आयोजक विद्याधर ठाणेकर हे दोनतीन वेळा आव्हाड यांची भेट घेण्याकरिता त्यांच्याकडे जाऊन आले. मात्र, भेट झाली नाही. सर्व लोकप्रतिनिधींबरोबर आव्हाड यांचे नाव अनवधानाने प्रसिद्ध झाले आहे. मात्र, याबाबत ठाणेकर हेच अधिक सांगू शकतील.
विद्याधर ठाणेकर म्हणाले की, ठाण्यात २०१० साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी आ. संजय केळकर यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत प्रसिद्ध झाले. मात्र, जितेंद्र आव्हाड यांचे नाव नव्हते. त्या वेळी त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. ती आठवण ठेवून या वेळी चुकीची दुरुस्ती करण्याकरिता त्यांचे नाव स्वागत समितीमध्ये प्रसिद्ध केले. मात्र, आव्हाड यांना ही बाब खटकली असेल, तर त्यांची दिलगिरी व्यक्त करू.
सावरकर संमेलनाच्या आयोजकांनी केवळ आव्हाड यांचेच नव्हे, तर वसंत डावखरे, निरंजन डावखरे, आनंद परांजपे, मनोज शिंदे अशा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांचीही नावे स्वागत समितीमध्ये घुसडली आहेत. आनंद परांजपे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, या संमेलनाचे निमंत्रण आपल्याला पाठवले आहे. मात्र, स्वागत समितीमध्ये नावाचा समावेश करण्याबाबत आपलीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचीही पूर्वपरवानगी न घेता नाव प्रसिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनात गांधी-नेहरूंवर तोंडसुख
सावरकर संमेलनाचे अध्यक्ष पत्रकार रमेश पतंगे यांनी उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणात महात्मा गांधी व पं. जवाहलाल नेहरू यांच्यावर सडकून टीका केली. ही टीका ऐकल्यावर गांधी-नेहरूंची विचारधारा मानणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संमेलनास उपस्थित का राहावे आणि स्वागत समितीमधील सदस्यत्व का मिरवावे, असा प्रश्न त्यांना पडणे साहजिक आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींसारखे चरख्यावर बसून सूतकताई करणारी आपली छायाचित्रे काढून घेऊन खादी ग्रामोद्योगची कॅलेंडर देशभर वाटत असताना पतंगे यांना मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षीच गांधीयुगाचा अंत झाला, असे वाटते.
गांधीभक्तांनी गांधीजींना सरकारी नोटांवर स्थान दिले आणि सरकारी कार्यालयाची भिंत दिली. हिंदुत्ववाद्यांना झोडपण्याकरिता त्यांनी गांधींचा उपयोग केला, असे वाटते. १९२० साली महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि तेथून पराकोटीच्या मुस्लिम अनुनयाच्या राजकारणाचा कालखंड सुरू झाला आणि त्याचा शेवट १९४७ साली देशविभाजनात झाला, असा जावईशोध पतंगे यांनी लावला आहे.
सावरकरांबद्दल पराकोटीच्या द्वेषाचे नेतृत्व पंडित नेहरूंनी केले. पण, त्यांचाच वारसा संकुचित होत गांधी घराण्यापुरता मर्यादित झाला आहे आणि सावरकरांचा वारसा विश्वव्यापी होतो आहे.
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचा वाचाळवीर असा उल्लेख पतंगे यांनी केला असून मूर्खपणाची विधाने करण्याला पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला, तर सिंग हे त्याचे पहिले मानकरी ठरतील, अशा दुगाण्या पतंगे यांनी झाडल्या आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कै. यू.आर. अनंतमूर्ती यांनी हयात असताना जर मोदी देशाचे पंतप्रधान झाले, तर मी देश सोडेन, असे म्हटले होते. आज ते देश सोडून देवाच्या दरबारात गेले आहेत, असे मत पतंगे यांनी व्यक्त केले. अनंतमूर्ती यांना गांधी आणि सावरकर समजले नाहीत. तसेच हिंदू संकल्पना समजलेली नाही, असे पतंगे म्हणाले.
पाकिस्तानच्या दहशतवादाला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. आपला एक जवान मेला, तर पाकिस्तानचे १० सैनिक ठार केले पाहिजेत. युद्धाला भिऊन राष्ट्र जिवंत राहत नाही. कंदहारमधील शरणागती हा राष्ट्रीय कलंक असून तो सर्जिकल आॅपरेशनसारखे उपक्रम करून धुऊन काढला पाहिजे. यालाच सावरकर विचार जगणे म्हणतात, असे पतंगे यांचे मत आहे.
पाकिस्तान निर्माण झाले, त्यामुळे भारतातील मुसलमानांचा प्रश्न संपलेला नाही. तो भविष्यात कधी उग्र रूप धारण करील, हे सांगता येणार नाही. भारताच्या दृष्टीने तो अनफिनिश्ड अजेंडा आहे. त्याचा फार वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे, असा गर्भित इशारा पतंगे यांनी दिला आहे.