अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:42+5:302021-09-02T05:27:42+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांवर झालेला हल्ला हा केवळ त्यांच्यावर नसून तो संपूर्ण प्रशासनावर ...

अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही तीव्र करणार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांवर झालेला हल्ला हा केवळ त्यांच्यावर नसून तो संपूर्ण प्रशासनावर होता. त्यामुळे काम बंद आंदोलन तर केले आहेच; शिवाय यापुढे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिला.
बुधवारी या हल्ल्याच्या निषेधार्थ एमएमआर रिझनमधील ४० हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीदेखील काम बंद ठेवून, हा पिंपळे त्यांच्यावरील हल्ला नसून तो संपूर्ण प्रशासनावर असल्याचे सांगून अशा घटना यापुढे घडू नयेत या उद्देशाने हे आंदोलन केल्याची माहिती उपायुक्त वाघमळे यांनी दिली. अशा भ्याड हल्ल्याला आम्ही जुमानणार नसून, यापुढे जाऊन शहरातील अनधिकृत बांधकामे असतील किंवा फेरीवाले, त्यांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील अशाच पद्धतीने काम बंद आंदोलन करून, काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदविला.
......
ठाण्यातील साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकरी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांचीदेखील भेट घेणार आहे. या काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात, हाच त्यामागचा उद्देश आहे. (रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी, ठाणे)