टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:07 AM2019-06-18T00:07:46+5:302019-06-18T00:07:54+5:30

आपत्कालीन कक्षास हस्तांतरित; मीरा-भाईंदरकर त्रस्त

Answers from Tollfree Numbers | टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे

टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे

मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरु करण्यात आलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेच्या १८००२२४८४९ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना चक्क उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा क्रमांक हा आपत्कालीन कक्षास हस्तांतरित करण्यात आला असून, तेथील कर्मचाऱ्यांना हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारींसाठी आहे, याची कल्पनाच नाही.

बेकायदा होर्डिंग, जाहिरात फलक, कमानी आदींवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये महापालिकेने १८००२२४८४९ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या तक्रारींसाठी सुरु केला. हा क्रमांक महापालिका मुख्यालयातील दुरध्वनी आॅपरेटर कक्षात होता. त्यानंतर शहरातील वाढत्या डेंग्यू - मलेरीयाच्या लागणमुळे संबंधित रुग्ण, स्वच्छता, डासनाशक फवारणी आदींसाठी पालिकेकडून हाच टोल फ्री क्रमांक देण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यातील खड्ड्यांवरुन महपालिका आदींची झाडाझडती घेतल्याने खड्ड्यांबाबतच्या तक्रारी करण्यासाठीदेखील शहरातील नागरिकांना हाच टोल फ्री क्रमांक देण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामे, पदपथ आदी सर्वच प्रकारच्या तक्रारी एकाच टोल फ्री कमांकावर नागरिकांनी कराव्यात, असा प्रशासनाने निर्णय घेतला. टोल फ्री क्रमांक पालिका मुख्यालयातील दुरध्वनी आॅपरेटर कक्षात असल्याने केवळ कार्यालयीन वेळेत आलेल्या तक्रारींची नोंद व्हायची. अन्यवेळी तक्रारीसाठी फोन करणाºया नागरिकांचे फोन उचललेच जात नव्हते.

टोल फ्री क्र मांक २४ तास सुरु ठेवणे आवश्यक असल्याने आॅक्टोबर २०१७ मध्ये सदरचा क्रमांक मीरारोडच्या कनकिया येथील आपात्कालिन कक्षात हलवण्यात आला. सदरचा कक्ष आपात्कालिन सेवेसाठी असल्याने येथे अन्य तक्रारींसाठी संपर्क साधणाºया नागरिकांच्या तक्रारींची नोंद करुन न घेता संबंधित विभागाशी संपर्क करा असे सांगितले जाते. शिवाय टोल फ्रीवर येणाºया तक्रारींची नोंदच केली जात नसून, त्यासाठी नोंद वहीदेखील ठेवलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांच्या सोयीसाठी सुरु झालेल्या टोल फ्री क्रमांक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

विशेष म्हणजे, पालिकेच्या संकेतस्थळावर हा टोल फ्री क्रमांक खड्डे, बेकायदा जाहिरात फलक, रस्ते, पदपथ, डेंग्यू - मलेरीया साथरोग, किटकनाशक फवारणी, साफसफाई, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग आदीसाठींच्या तक्रारींकरीता असल्याचे नमूद आहे. तरीही येथे नागरिकांच्या तक्रारींना उत्तर दिले जात नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टोलफ्री क्रमांकावर सोमवारी सकाळीच तक्रारीसाठी फोन केला असता, हा आपत्कालीनसाठीचा क्रमांक असून संबंधित विभागाच्या आणि प्रभाग अधिकाºयाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करा, असे सांगण्यात आले. पालिका लेखी तक्रारींवरदेखील कारवाई करत नाही आणि टोल फ्रीवर तर तक्रारच घेत नाही.
- मनोज राणे, नागरिक

नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी सहजपणे महापालिकेकडे करता याव्यात म्हणून टोलफ्री क्रमांक असायलाच हवा. न्यायालयानेदेखील तसे आदेश दिले आहेत. फलक व संकेतस्थळावर टोलफ्री क्रमांक देऊनही जर पालिका कार्यवाही करत नसेल तर ते चुकीचे आहे. पालिकेला नागरिकांच्या तक्रारी घेण्यात आणि त्या सोडवण्यात स्वारस्य नाही हेच यातून स्पष्ट होते.
- माधुरी तांबे, नागरिक

Web Title: Answers from Tollfree Numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.