जानेवारी 2018 मध्ये होणार कोकण इतिहास परिषद वार्षिक अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 02:24 PM2017-10-07T14:24:46+5:302017-10-07T14:24:53+5:30
कोकण इतिहास परिषद वार्षिक अधिवेशन 20 व 21 जानेवारी 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाड (रायगड) येथे संपन्न होणार आहे
ठाणे : कोकण इतिहास परिषद वार्षिक अधिवेशन 20 व 21 जानेवारी 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाड (रायगड) येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे भुषवणार आहेत, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर यांनी शनिवारी (7ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिली.
देशपांडे हे चिपळूण ( जिल्हा रत्नागिरी) येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष आहेत. या परिषदेत कोकणचा समग्र इतिहास व संस्कृतीवर अनेक मान्यवर आपले शोध निबंध सादर करणार आहेत. तसेच, यावर्षी कोकण इतिहास परिषदेचा पुरस्कार बौद्ध वाड़मय व पाली भाषेच्या तज्ज्ञ डॉ. मीना तालीम यांना देण्यात येणार आहे. त्यामागील साडेपाच दशके के. जी. सोमैया सेंटर ऑफ बुद्धिस्ट व सेंट झेवियर कॉलेज येथे हेड डिपार्टमेंट एन्शन्ट इंडियन कल्चर अँड पाली भाषेच्या त्या प्रोफेसर होत्या.
2017 साली कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच वैभववाडी येथे झालेल्या परिषदेतील शोधनिबंधाचे पुस्तक प्रकाशन तसेच कोकण इतिहास पत्रिका त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कोकण विषयक निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मोडी लिपी अभ्यास सराव स्पर्धा होणार असून त्यांना परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येणार आहे.