संतप्त पालक गुरुवारी जाणार मुंबईत
By Admin | Updated: March 23, 2017 01:27 IST2017-03-23T01:27:10+5:302017-03-23T01:27:10+5:30
आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच

संतप्त पालक गुरुवारी जाणार मुंबईत
ठाणे : आरटीईअंतर्गत प्रवेश योजनेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ठाण्यातील पालकांनी शनिवारी आंदोलन केल्यावरही पालकांची परवड सुरूच आहे. त्यासंदर्भात, पालकांनी मंगळवारी प्राथमिकच्या जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव यांना निवेदन दिले. त्याला कोणतेही प्रतिसादात्मक उत्तर न मिळाल्याने आता ठाण्यातील संतप्त आणि हतबल पालक गुरुवारी शिक्षण उपसंचालक, मुंबई बी.बी. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.
आरटीई प्रवेश योजनेचा पहिला टप्पा सोमवारी संपणार होता. मात्र, अखेरपर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे ती मुदतही मंगळवारपर्यंत वाढवली. काही शाळांनी प्रवेश दिले. परंतु, प्रवेशानंतर त्यांनी शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालकांकडून पैशांची मागणी केली. आरटीई कायद्यांतर्गत शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत आहे. असे असतानाही शाळा पालकांची अडवणूक करत असल्याने मंगळवारी पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यादव यांना निवेदन दिले. या निवेदनाला शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे सांगून संतप्त पालक, विद्यार्थ्यांसह गुरुवारी मुंबई शिक्षण उपसंचालक चव्हाण यांना भेटण्याचा निर्णय डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)