पाण्यासाठी पंचायत समितीवर संतप्त महिलांचा आक्रोश
By Admin | Updated: May 13, 2017 00:49 IST2017-05-13T00:49:58+5:302017-05-13T00:49:58+5:30
विहिरींचे पाण्याचे स्रोत आटल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेढ्याचीवाडी येथील महिलांनी गुरुवारी

पाण्यासाठी पंचायत समितीवर संतप्त महिलांचा आक्रोश
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : विहिरींचे पाण्याचे स्रोत आटल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेढ्याचीवाडी येथील महिलांनी गुरुवारी थेट पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला धडक देऊन पाण्यासाठी आक्रोश केला. तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या काहिलीमुळे तालुक्यातील विहिरीतील पाण्याने तळ गाठायला सुरु वात केली. या पाड्यावर दोन विंधण विहिरी आहेत. परंतु, आता त्यातून पाणी येणे बंद झाल्याने ग्रामस्थांची अडचण होते आहे. या वाडीची वस्ती ३०० च्या आसपास आहे. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने येथील महिलांनी शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागावर धडक दिली आणि तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर, संतप्त महिलांनी आपला मोर्चा तहसील कचेरीकडे वळवला. तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच टँकर सुरू करण्यात येतील, असे सांगितले.