रहिवाशांसाठी संजय ठरला देवदूत, ३०० जणांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:19 IST2017-10-29T00:18:43+5:302017-10-29T00:19:36+5:30
पश्चिमेतील खचलेल्या नागूबाई निवास इमारतीमधील ६९ कुटुंबांतील ३०० सदस्यांसाठी रिक्षाचालक संजय पवार हा देवदूत ठरला.

रहिवाशांसाठी संजय ठरला देवदूत, ३०० जणांना वाचवले
अनिकेत घमंडी
डोंबिवली : पश्चिमेतील खचलेल्या नागूबाई निवास इमारतीमधील ६९ कुटुंबांतील ३०० सदस्यांसाठी रिक्षाचालक संजय पवार हा देवदूत ठरला. इमारतीच्या तळ मजल्यावर राहणारे संजय रिक्षा चालवून रात्री ८ च्या सुमारास घरी परतले होते. कुटुंबासमवेत चर्चा करत असताना घरातील एका भिंतीचा खालचा भाग तुटला आहे. दरवाजाचा भाग खचत असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता चौथा मजला गाठून प्रत्येकाला घराबाहेर काढले.
इमारतीचा भाग खचत असल्याची माहिती संजय यांनी भावाला कळवली. तेवढ्यात, त्यांना पिलर खचल्याचे दिसले. त्यानंतर, मात्र त्यांनी थेट चौथा मजला गाठला. दिसेल त्याचा दरवाजा वाजवत इमारतीबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. संजय यांचा आवाज आल्याने काय झाले आहे, हे पाहण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. इमारतीला गेलेले तडे व माती पडत असल्याचे ऐकल्यावर मात्र रहिवाशांनी जीव मुठीत धरून पळ काढला. त्यानंतरही संजय यांनी पुन्हा घरांमध्ये कोणी राहिलेले नाही ना, याची चाचपणी केली. सगळे बाहेर येताच तिसºया आणि चौथ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीला तडे गेले. काही काळातच इमारत कोसळणार, या भीतीने रहिवाशांना ग्रासले.
संजय यांच्या सतर्कतेमुळे सगळ््यांचे प्राण वाचल्याने रहिवासी व रिक्षा-चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी त्यांचे कौतुक केले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही समाधान व्यक्त केले.