रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या देखभालीबाबत अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:04 AM2019-08-09T00:04:23+5:302019-08-09T00:04:30+5:30

सोसायट्यांची खर्च करण्यास टाळाटाळ; पाण्याची पातळी वाढणार कशी?

Anesthesia on Rainwater Harvesting Maintenance | रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या देखभालीबाबत अनास्था

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या देखभालीबाबत अनास्था

googlenewsNext

- मुरलीधर भवर

कल्याण : राज्य सरकारने २००८ पासून प्रत्येक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ही यंत्रणा बसवल्याशिवाय इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही. केडीएमसी हद्दीत २००८ ते जून २०१९ पर्यंत एक हजार २०३ इमारतींमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. मात्र, त्याची देखभाल आणि दुरुस्ती सोसायट्यांकडून केली जात नाही. परिणामी, पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जात नाही. ते थेट नदी, नाले, खाडीला जाऊन मिळते.

नागरी वस्तीत सगळ्याच कामासाठी शुद्ध पाणी वापरले जात असून, ते चुकीचे आहे. पावसाचे पाणी जमिनीत साठवले तर बोअरवेल्सना भरपूर पाणी येते. तेच पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामकाजासाठी वापरले जाऊ शकते. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेपासून घराच्या शेजारच्या बागेसाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शुद्ध पाण्याची बचत होऊ शकते. परंतु, काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे.

नव्या इमारतींमध्ये बिल्डरने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लागू करणे आवश्यक आहे. ही यंत्रणा बसवली नाही तर त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जाऊ नये, अशी अट आहे. सरकारने २००८ मध्ये त्यासाठी जीआर काढला. तेव्हापासून बिल्डर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी ही यंत्रणा बसवून देतात. मात्र, पुढे सोसायटी स्थापन झाल्यावर या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती सोसायटीने स्वत:च्या खर्चातून करणे अपेक्षित आहे. मात्र, ते होत नाही. याबाबत, एमसीएचआय या बिल्डर संघटनेचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, बिल्डर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बांधून देतो. मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती सोसायट्यांकडून केली जात नाही. त्यामुळे या यंत्रणा कालांतराने निरुपयोगी होतात. त्याचा काही उपयोग नाही. केवळ दाखला मिळवण्यासाठी ही यंत्रणा उभी केली, असा त्याचा अर्थ होतो. बिल्डरने त्यांची जबाबदारी पार पाडली. सोसायटीने त्यांची जबाबदारी पार पाडल्यास पाण्यासारख्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो.

नगरसेवक निधीला महापालिकेची नकारघंटा
२००८ च्या आधीच्या सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नाही. त्याकरिता नगरसेवक निधीतून ही यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवक राहुल दामले यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी त्याचा नगरसेवक निधी देऊ केला होता. महापालिका प्रशासनाने त्यांच्या या प्रस्तावाला नकारघंटा दर्शवित खाजगी सोसायटीत नगरसेवक निधीचा वापर करता येत नाही, असे कारण पुढे केले.
या प्रस्तावावर राज्य सरकारकडून पुनर्विचार होणे अपेक्षित आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेणारे मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी त्यांच्या परिसरात सहा सोसायट्यांमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. पावसाचे पाणी बोअरवेल्समध्ये सोडले आहे. त्यासाठी अवघा १६०० ते दोन हजार रुपये खर्च आला. दोन हजार रुपयांत सोसायटी पाणीटंचाईग्रस्त काळात टँकरमुक्त होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा दाखला घेतलेल्यांची संख्या
प्रभाग अ -९७
प्रभाग ब-२१६
प्रभाग क-१३७
प्रभाग ड आणि जे-१०३
प्रभाग फ आणि ग-३३८
प्रभाग ह-२२०
एकूण-१२०७

Web Title: Anesthesia on Rainwater Harvesting Maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.