अन् काळ्या पैशांना फुटले पाय

By Admin | Updated: November 11, 2016 03:10 IST2016-11-11T03:10:29+5:302016-11-11T03:10:29+5:30

अर्थव्यवस्थेतील काळा पैसा संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्याचे सांगितले जात असले तरी काळ्या पैशांचे

And black money split legs | अन् काळ्या पैशांना फुटले पाय

अन् काळ्या पैशांना फुटले पाय

ठाणे/डोंबिवली : अर्थव्यवस्थेतील काळा पैसा संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्याचे सांगितले जात असले तरी काळ्या पैशांचे व्यवहार करणारे उद्योजक, व्यापारी, बिल्डर, गँगस्टर आदींनी मोदींच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचे उद्योग सुरू केले आहेत.
सरकारने अडीच लाखांपर्यंतची रक्कम खात्यात जमा करण्यास मुभा दिल्याने त्याचा गैरफायदा घेत काही काळा पैसा बाळगणाऱ्यांनी सर्वसामान्य नोकरदारांना त्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात अडीच लाख रुपयांच्या रद्द नोटा जमा करण्याचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली आहे. याकरिता एक लाख रुपयांसाठी १० हजार रुपयांचे कमिशन दिले जात आहे. त्यामुळे अडीच लाख जमा करणाऱ्यास २५ हजार रुपये कमिशनपोटी दिले जात आहेत. कल्याण-डोंबिवलीमधील काही बिल्डर, राजकीय नेते, व्यापारी यांनी आपले चेलेचपाटे याकरिता कामाला लावले आहेत. ती कुणाकुणाची बँक खाती आहेत, त्यापैकी कोणत्या खात्यावर किती उलाढाल होते, याची माहिती घेत असून जर एखादा खातेदार विश्वासार्ह वाटला तर लागलीच त्याच्याकडे अडीच लाखांच्या हजार-पाचशेच्या नोटा आणून देत आहेत. डोंबिवली शहराबाहेरील कल्याणकडे जाणाऱ्या हायवेवर सध्या बारचे पेव फुटले असून तेथे बँक खातेदारांना बोलवून रक्कम जमा करण्याचे आमिष दाखवले जात आहे. सध्या या व्यक्तीने ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करायची व कालांतराने पैसे काढून घेण्यावरील बंधने शिथिल झाल्यावर परत करायची. याकरिता एक लाखामागे १० हजार रुपये असा कमिशनचा दर आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला बँकेत खाते काढणे सक्तीचे केले. काही खात्यांवर कुठलेही व्यवहार झालेले नाहीत. अशी निरंक खाती काही दिवसासाठी ‘मालामाल’ होतील.


सराफ बाजारात सध्या सोन्याचे दोन दर असल्याची चर्चा आहे. १०० रुपयांच्या नोटा देऊन १० ग्रॅम सोने खरेदी करायचे असल्यास बुधवारचा दर ३४ हजार रुपये होता व तो गुरुवारी ३३ हजार रुपये झाला.
मात्र, रद्द झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारून हीच सोनेखरेदी केली जाणार असेल तर १० ग्रॅम सोन्याचा दर बुधवारी ६० हजार होता व तो गुरुवारी ५८ हजार रुपये झाला.
ज्या सराफांकडे उत्पन्नाचा स्रोत दाखवण्याची सोय आहे, त्यांनी दुप्पट-तिप्पट दर वाढवून सोनेविक्री केली व नफा कमावला.
ज्यांच्याकडे पाचशे-हजारांच्या नोटांचा हिशेब देण्याची सोय नाही, त्यांनी या रद्द नोटांच्या बदल्यात सोनेखरेदी करून आपल्या पैशांचे मूल्य काही प्रमाणात टिकवून ठेवले.


‘त्या’ निर्णयाचा ‘वसुली’ला फटका
कल्याण : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने त्याचा फटका महापालिकेच्या मालमत्ताकर, पाणीबिल आणि ‘महावितरण’च्या वीजबिलवसुलीलाही बसला आहे. या कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून नोटा स्वीकारल्या जात नसल्याने कर भरण्यासाठी आलेले नागरिक व वीजग्राहकांची तारांबळ उडाली. अखेर, गुरुवारी दुपारी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘महावितरण’च्या वीजबिल भरणा केंद्रांवर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद उद्भवल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सध्या केडीएमसीची मालमत्ताकर आणि पाणीबिल वसुलीची मोहीम जोमात सुरू आहे. यात थकबाकीदारांना थकीत रकमा भरा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. वेळप्रसंगी कर थकवणाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाईही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच आता केंद्राने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याची घोषणा करताच केडीएमसीनेही प्रत्येक प्रभागातील नागरी सुविधा केंद्रांवर फलक लावून या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे जाहीर केले. त्याचा त्रास नागरिकांना झाला. तसेच महापालिकेच्या वसुलीवरही त्याचा परिणाम झाला. साधारण एका केंद्रावर वसुलीच्या माध्यमातून प्रतिदिन अडीच ते तीन लाखांची रोकड जमा होते. यात डोंबिवली विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा कें द्रात बुधवारी ६७ हजार जमा झाले. नागरिकांनी कर भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा दिल्यास त्या स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यामुळे बुधवारी संपूर्ण दिवस करदाते नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वारंवार खटके उडत होते. गुरुवारीही दुपारपर्यंत हे चित्र कायम होते. या नोटा जमा करण्याबाबत ३० डिसेंबरपर्यंत मुदत असताना नोटा न स्वीकारणे हे चुकीचे आहे, असे ७० वर्षीय विजय पावसकर म्हणाले. कर भरण्यासाठी आलेल्या प्रमोद भागवत यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. एकीकडे नागरिकांना कर भरण्यासंदर्भात आवाहन करायचे आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी येणाऱ्यांची अशी अडवणूक करायची. आमच्या वेळेला किंमत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

आजच मिळणार सुविधा
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे करदाते आणि वीजग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले असताना यातील वाढता रोष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या आदेशानंतर मात्र या नोटा स्वीकारण्याचे परिपत्रक केडीएमसीने जारी केले. मात्र, ही सुविधा शुक्रवार, ११ नोव्हेंबरपर्यंतच असेल. सर्व नागरी सुविधा केंद्रांवरही ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील, अशी माहिती महापालिकेचे सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली.

दस्त हस्तांतरणासाठी ‘डीडी’ची सक्ती
ठाणे : नव्याने फ्लॅट खरेदी केलेल्यांना त्यांच्या दस्त हस्तांतरण व्यवहाराकरिता बँकांमधून डीडी काढून आणण्यास सांगितले जात असून सध्या बँकेतील यच्चयावत कर्मचारी हे नोटा रद्द झाल्याने त्या कामात व्यस्त असल्याने काही बँकांनी डीडी तत्काळ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विशिष्ट दिवसाचा मुहूर्त साधून घरखरेदीचे रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
बुधवारी बँका व एटीएम संपूर्णपणे बंद होते. गुरुवारी सकाळी बँका उघडण्यापूर्वीच अनेकांनी बँकाच्या बाहेर लांबचलांब रांगा लावल्या होत्या. ठाणे रजिस्ट्रार आॅफिसनेही रद्द नोटा घेण्यास नकार दिला. रजिस्ट्रेशन, स्टॅम्पड्युटीचे व्यवहार जरी आता आॅनलाइन होत असले तरीदेखील दस्त हस्तांतरणाचे व्यवहार हे आजही पैशांच्या स्वरूपात होत असल्याने रजिस्ट्रार आॅफिसने सूचना फलक लावून हे पैसे डीडी स्वरूपात स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले. त्यामुळे रोख भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा बँकेचा रस्ता धरावा लागला. बँकांमध्ये गुुरुवारी नोटा बदलून घेण्याकरिता गर्दी उसळलेली असल्याने काही बँकांनी लागलीच डीडी देण्यास नकार दिला, तर काहींना डीडीकरिता रांगा लावाव्या लागल्या. परिणामी, नव्या फ्लॅटधारकांचे अधिकच हाल झाले. दरम्यान, यासंदर्भात रजिस्ट्रार आॅफिसने सांगितले की, डीडी मागितल्याने सर्वांनाच त्रास झाला आहे. परंतु, आमचे कर्मचारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सेवा देण्याकरिता तत्पर आहेत.

महावितरण घेणार रद्द नोटा
‘महावितरण’च्या वीजबिल केंद्रात ५०० आणि एक हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने बिलभरणा केंद्राबाहेर दुपारपर्यंत शुकशुकाट होता. परंतु, दुपारनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार या नोटा स्वीकारण्याची तयारी महावितरणने दर्शवली असून उद्या ११ नोव्हेंबरपर्यंत या नोटा स्वीकारल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: And black money split legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.