रेल्वे स्टेशनवर चोख पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST2021-08-17T04:45:45+5:302021-08-17T04:45:45+5:30
अंबरनाथ/ बदलापूर: स्वातंत्र्य दिनापासून दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अंबरनाथ आणि ...

रेल्वे स्टेशनवर चोख पोलीस बंदोबस्त
अंबरनाथ/ बदलापूर: स्वातंत्र्य दिनापासून दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या पासची तपासणी करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, १५ ऑगस्ट असल्यामुळे नोकरदार वर्गाची गर्दी अल्प प्रमाणात होती.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात पहाटे सहा वाजल्यापासून रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांच्या पासची तपासणी करीत होते. मात्र, १५ ऑगस्ट असल्यामुळे अनेक ठिकाणी सुट्टीचे वातावरण असल्याने आणि रविवारची सुट्टी जोडून आल्याने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अल्प होती. जे प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघत होते, त्यांच्या पासची तपासणी प्रवेशद्वाराजवळच करण्यात येत होती. बदलापूर स्थानकातही रेल्वे सुरक्षा दलाच्या माध्यमातून पासधारकांची तपासणी केली जात होती. जे प्रवासी नियमित प्रवास करण्यासाठी बाहेर पडले होते, त्यांना तिकीट खिडकीवर तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. चोख पोलीस बंदोबस्त असल्याने, इतर प्रवाशांना सुरक्षा कवच भेदून रेल्वेने प्रवास करणे शक्य झाले नाही.
नगरपालिकेच्या वतीने दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना पास देण्याची सुविधा देण्यात आली होती. पास काढण्यासाठी त्या प्रवाशांनी काही प्रमाणात गर्दी केली होती.