शालेय साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात

By Admin | Updated: April 1, 2017 05:42 IST2017-04-01T05:42:10+5:302017-04-01T05:42:10+5:30

मीरा-भाईंदर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या खरेदीसाठी प्रशासनाने थेट त्यांच्या खात्यात

The amount of school material in the student's account | शालेय साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात

शालेय साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात

 राजू काळे / भार्इंदर
मीरा-भाईंदर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या खरेदीसाठी प्रशासनाने थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे साहित्य खरेदीसाठी वाट पाहवी लागणार नसल्याचे सांगितले जात आहे.
पालिकेने निश्चित केलेल्या दुकानातून विद्यार्थ्यांना मंजूर दरानुसार साहित्य खरेदीची मुभा मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्यांना साहित्य मिळावे. यात पारदर्शकता आणण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.
राज्य सरकारने ५ डिसेंबर २०१६ मध्ये काढलेल्या आदेशातील विविध सरकारी तसेच स्थानिक प्रशासनाच्या कल्याणकारी योजनातंर्गत वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या निर्देशानुसारच नव्याने प्रक्रीया करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहरात पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती माध्यमांच्या ३५ शाळा आहेत. त्यात सुमारे ८ हजार ५०० विद्यार्थी आहेत. त्यांना पालिका दरवर्षी मोफत शालेय साहित्यांचे वाटप करते. गणवेश, दप्तर, वह्या, वॉटर बॉटल, बूट-मोजे यांचा समावेश असतो.
शाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शालेय साहित्य खरेदीच्या प्रक्रीयेला सुरूवात होते. या प्रक्रीयेला विलंब लागत असल्याने शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर चार ते सहा महिन्यांनी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले जाते. प्रशासनाच्या या अतिविलंबामुळे दरवर्षी वाभाडे निघतात.
यंदा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्य वाटपाच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यात केवळ शहरातील वॅटधारक व गुमास्ता परवानाधारक दुकानदारांकडून निविदा मागविल्या. ज्या दुकानदाराच्या निविदेला मान्यता मिळेल, त्याच्याकडूनच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रशासनाने मंजूर केलेल्या दरानुसार खरेदी करावे लागणार आहे. त्याचा खर्च प्रशासन विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा निकालाच्यावेळी पालकांना पालिकेने निश्चित केलेल्या दुकानातून स्वखर्चाने साहित्य खरेदीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतरच त्याचा खर्च थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. गणवेशाच्या कापडाच्या दर्जावर आक्षेप असल्यास त्याच्या दर्जाची तपासणी प्रयोगशाळेत केली जाईल. या नवीन प्रक्रीयेचा प्रस्ताव येत्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
- सुरेश देशमुख, शिक्षणाधिकारी.

Web Title: The amount of school material in the student's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.