कसारा, किन्हवलीतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सलाइनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:34+5:302021-04-03T04:36:34+5:30
कसारा : शहापूर तालुक्यातील कसारा व किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका गेले कित्येक दिवस नादुरुस्त असल्याने ती ...

कसारा, किन्हवलीतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सलाइनवर
कसारा : शहापूर तालुक्यातील कसारा व किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका गेले कित्येक दिवस नादुरुस्त असल्याने ती आता सलाइनवर आहे. अत्यवस्थ रुग्णाला पुढील उपचारासाठी नेताना रस्त्यात बंद पडली, तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. कसारा, किन्हवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी याबाबत वारंवार कळवूनही संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम व राज्य सरकार अंतर्गत शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका काही दिवसांपासून क्लचपेट कमकुवत झाल्याने नादुरुस्त आहे. तर, कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका असून नसल्यासारखी आहे. क्लच, ब्रेक यासह अनेक समस्यांनी ही रुग्णवाहिका ग्रासली आहे. अपघातग्रस्त वा अन्य अत्यवस्थ रुग्णाला पुढील उपचारासाठी शहापूर किंवा ठाणे येथे नेले जात असताना ती रस्त्यात कुठेही बंद पडू शकते, अशी स्थिती आहे. चालकाला रुग्णाच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, कसारा घाटात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी दुर्गम भाग असल्याने गरोदर, सर्पदंश यासह अन्य आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. तर, किन्हवली हा परिसर आदिवासीबहुल असून येथे सर्प व विंचूदंशांचे बरेच रुग्ण असतात. गरोदर मातांना प्रसूतीसाठी व गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी खासगी वाहनांतून घेऊन जावे लागते. त्याचे भाडे परवडत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसतो.
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना अन्य आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागते.