अंबरनाथच्या तरूणाची कबड्डीमध्ये भरारी
By Admin | Updated: June 28, 2017 03:20 IST2017-06-28T03:20:27+5:302017-06-28T03:20:27+5:30
घरची परिस्थिती बेताची असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका तरूणाने कबड्डीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे.

अंबरनाथच्या तरूणाची कबड्डीमध्ये भरारी
पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : घरची परिस्थिती बेताची असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका तरूणाने कबड्डीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. आज याच कबड्डीच्या जोरावर या तरुणाने आपला कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. या तरूणाने प्रो कबड्डी स्पर्धेत ‘दबंग दिल्ली’ संघात स्थान निश्चित केले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली गावातील तुषार भोईर या तरूणाला लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. मात्र भविष्यात या क्षेत्रातच आपले भवितव्य निश्चित करण्यासाठी त्याने कबड्डी खेळावरच आपले लक्ष केंद्रीत केले. मातीच्या मैदानावर रमलेला तुषारला भरारी घेण्याची जिद्द असल्याने त्याने मॅटवरील कबड्डीवर आपले लक्ष केंद्रीत केले.
देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅटवरच कबड्डीचे सामने होत असल्याने त्याने मॅटवर कबड्डीचा सराव सुरू केला. मात्र अंबरनाथ तालुक्यात मॅटवरील कबड्डीचा सराव करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र किंवा संघ नसल्याने त्याने कल्याणच्या शिवशंकर संघाकडे धाव घेतली. या संघात त्याने रितसर मॅटवरील सराव सुरू केला. कल्याणच्या या नावाजलेल्या संघातून त्याने खेळताना राज्य पातळीवर सर्वाेत्कृष्ट कामगिरी बजावली. कुमार गटाचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असतानाच त्याला एक अनोखी संधी मिळाली. प्रो कबड्डी स्पर्धेतील दिल्ली दबंग संघाकडून खेळाडूंची निवड करण्यासाठी वडाळा येथे शिबिर झाले. या शिबिरात तुषार याने हजेरी लावत या निवडचाचणीत चांगली कामगिरी बजावली.
बचाव फळीत खेळताना अनेक खेळाडूंना त्याने आपल्या खेळातील दम दाखवला. त्याचा हा खेळ पाहून दबंग दिल्ली संघाने त्याची संघात निवड केली आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत त्याने कबड्डीमध्ये निर्माण केलेली जागा ही ग्रामीण भागातील खेळाडूंसांठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तुषार याचे शालेय शिक्षण हे आंबेशिव या गावात झाले. तुषारने कबड्डीमधील आपले गुरू कल्याणचे यशवंत यादव अािण कोल्हापूरचे रमेश भेंडीगिरे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून प्रोत्साहन घेत त्याने हे शिखर गाठले आहे. खास पैलू सुधारण्यात शिवशंकर क्रीडा मंडळाचा मोठा वाटा राहिला आहे.