अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 03:21 PM2022-05-22T15:21:45+5:302022-05-22T17:32:36+5:30

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकात नव्याने बांधलेला होम प्लॅटफॉर्मवर महिला डब्याच्या ठिकाणी जीवघेणा गॅप राहत आहे. त्यामुळे लोकल पकडताना आणि ...

Ambernath's life-threatening 'gap' on home platform; Women's flying mess | अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ

अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ

Next

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकात नव्याने बांधलेला होम प्लॅटफॉर्मवर महिला डब्याच्या ठिकाणी जीवघेणा गॅप राहत आहे. त्यामुळे लोकल पकडताना आणि उतरताना बदलापूर दिशेकडील अंबरनाथ होम प्लॅटफॉर्मवर जागाच शिल्लक नसल्याने जिवावर उदार हाेऊनच महिला प्रवाशांना उतरावे लागत आहे.

अंबरनाथ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण आणि नवीन पादचारी पूल बांधणे, तसेच होम प्लॅटफॉर्मसारखी कामे लॉकडाऊनच्या कालावधीत वेगाने करण्यात आली होती. काही कामे प्रगतिपथावर आहेत. फलाटावरील सोयीचा प्रवाशांना फायदा झाला. मात्र, नव्याने बांधलेला १ए या फलाटावरून कर्जत अथवा बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलचे सुमारे अडीच डबे गेल्यानंतर फलाट सुरू होताे, त्याच ठिकाणी महिलांचा डबा येत असल्याने नव्या फलाटावरून गाडी पकडणे अथवा उतरण्यासाठी महिला प्रवाशांना कसरत करावी लागते. बाकी नऊ डब्यांना दोन्ही दिशेला फलाट आहे.

होम प्लॅटफॉर्मची उभारणी करताना बदलापूर दिशेकडील हाेम प्लॅटफॉर्म पूर्ण का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी (दि. २० मे) सायंकाळी ५ वाजता कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल पकडताना एक महिला प्रवासी फलाटावरून खाली पडली. इतर प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केल्याने मोटारमनने गाडी थांबवून ठेवली. संबंधित महिलेला सुखरूप फलाटावर घेण्यात आले. प्रथोमपचार करून तिला सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले.

काय आहे समस्या?

नव्या फलाटावर उतरण्यासाठी सोय नसून, लोखंडी कठडे बांधले असून, पहिल्या एक आणि दोन डब्यांतील प्रवाशांना केवळ जुन्या एक नंबर फलाटावरच उतरावे लागते. बदलापूर दिशेकडील रेल्वे केबिनमुळे हाेम प्लॅटफाॅर्म अर्धवट ठेवला आहे. प्रत्यक्षात या केबिन आणि रेल्वे रुळाच्या मध्ये पुरेशी जागा असतानाही तेथे होम प्लॅटफॉर्मचे काम न करता लोखंडी राॅड टाकून हा भाग बंद केला आहे. फलाट १ ए वर असलेली ही समस्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आली असून, मोटारमनची केबिन फलाट सुरू होतो तेथून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Ambernath's life-threatening 'gap' on home platform; Women's flying mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.