अंबरनाथमधील शिक्षिकांचे उपोषण
By Admin | Updated: December 23, 2016 02:59 IST2016-12-23T02:59:24+5:302016-12-23T02:59:24+5:30
चुकीच्या पद्धतीने सेवाज्येष्ठता, योग्य उमेदवाराला डावलून दुसऱ्यांनाच पदोन्नती आणि निर्णय चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या

अंबरनाथमधील शिक्षिकांचे उपोषण
अंबरनाथ : चुकीच्या पद्धतीने सेवाज्येष्ठता, योग्य उमेदवाराला डावलून दुसऱ्यांनाच पदोन्नती आणि निर्णय चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या विरोधात अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सहा शिक्षिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी बेमुदत उपोषणास सुरुवात केली.
अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय आणि भाऊसाहेब परांजपे महाविद्यालयाच्या सहा शिक्षिकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मीना शिंदे, दीपा सुर्वे, सुलोचना वीर, नयना गुळीक, संगीता चव्हाण आणि पुष्पा सातपुते अशी या महिलांची नावे असून यातील बहुतांश शिक्षिका वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आहेत. दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयात काही वर्षांपासून सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि शासन मान्यता नसतानाही पदे भरल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे.
मागासवर्गीय असल्याने आमची पदोन्नती रोखण्यात आली असून त्याऐवजी दुसऱ्याच अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्याचा आरोपही या वेळी आंदोलनकर्त्या सुलोचना वीर यांनी केला आहे. अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिलेल्या कामगारास नोकरीवरून कमी केले जाऊ शकत नाही. असे असतानाही पुष्पा सातपुते यांना अचानकपणे नोकरीवरून काढून टाकले.
त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले. मात्र, त्यांना नियुक्तीचे कोणतेही लेखी पत्र देण्यात आलेले नाही. तसेच दोन शिक्षिकांना सेवेत ३२ वर्षे पूर्ण होऊनही पदोन्नती दिली जात नाही. त्याच वेळी नवख्या शिक्षकांना पदोन्नती देऊन पुढे पाठवण्यात येत असल्याचा आरोपही या शिक्षिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)