बदलापूर : अंबरनाथ तालुक्याचे क्रीडा संकुलाचे छत पूर्णपणे कोसळले असून पावसामुळे हा अपघात घडला आहे. क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी दिली आहे. तर दुसरीकडे महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या क्रीडा संकुलाच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यात ही इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. असे असताना देखील छत पूर्ण कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात इंडोर गेम साठी भव्य शेड उभारण्यात आली होती. या इंडोर शेडमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस या सोबतच इतर गेम्स देखील खेळले जात होते. त्याच ठिकाणी क्रीडा संकुलाचे कार्यालय देखील होते. ही शेड अर्धी भिंत आणि उर्वरित छत लोखंडी पत्रे आणि लोखंडी कॉलम वापरून उभारण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून या इंडोर गेम्सच्या वस्तूला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. याबाबत क्रीडा रसिकांनी तक्रार देखील केली होती. मात्र या तक्रांकडे दुर्लक्ष केल्यानेच मुसळधार पावसात क्रीडा संकुलाची इंडोर गेमची शेड पूर्णपणे कोसळली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नसली तरी या प्रकारामुळे क्रीडा संकुलाचे काम किती निकृष्ट दर्जाचे होते याचा प्रत्यय खेळाडूंना आला आहे. यासोबतच या क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्ती कडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. --------फोटो आहे
अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले
By पंकज पाटील | Updated: June 27, 2023 18:36 IST