अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
By पंकज पाटील | Updated: June 19, 2023 17:41 IST2023-06-19T17:41:31+5:302023-06-19T17:41:41+5:30
अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.

अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर पालिकेने आज मनसे आणि फेरीवाल्यांसह एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यावर एकमत झाले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर लवकरच फेरीवाला मुक्त होण्याची चिन्हं आहेत.
अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र कारवाई करताना फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था किंवा फेरीवाला धोरण ठरवून देण्याची मागणी ही फेरीवाल्यांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने आज मनसे आणि फेरीवाले यांच्यासोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, तर फेरीवाल्यांकडून ज्येष्ठ कामगार नेते श्यामदादा गायकवाड, फेरीवाला संघटनेचे नल्ला स्वामी उपस्थित होते.
मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत झाले. ज्यामध्ये स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांचे स्थलांतर करणे प्रत्येक फेरीवाल्याला फक्त ३ पाट्या घेऊन बसण्याची परवानगी, रेल्वे ब्रिजवर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आणि स्टेशन परिसरापासून १५० मीटरचा पट्टा मारून त्यामध्ये फेरीवाले बसणार नाहीत,असे निर्णय घेण्यात आले. स्टेशन परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचे पूर्वेकडे य. मा. चव्हाण नाट्यगृह किंवा बॉम्बे हॉटेलच्या गल्लीत स्थलांतर करण्यात येणार असून पश्चिमेच्या फेरीवाल्यांचे एसटी डेपोच्या जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून मनसे आणि फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळासह या सर्व जागांची आज पाहणी करण्यात आली. त्यानुसार भविष्यात नागरिकांना त्रास होऊ नये आणि सातत्याने पालिकेच्या होणाऱ्या कारवायांमुळे फेरीवाल्यांच्याही पोटावर पाय येऊ नये यासाठी स्थलांतराच्या भूमिकेला फेरीवाल्यांनी ही समर्थन दर्शवले. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा परिसर मनसेच्या दणक्याने लवकरच फेरीवालामुक्त होण्याची चिन्हं आहेत.