भाजपाकडून पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचे वाटप
By Admin | Updated: February 3, 2017 15:07 IST2017-02-03T15:06:56+5:302017-02-03T15:07:28+5:30
तिकीट वाटपावरुन राडा झाल्यामुळे शुक्रवारी रात्री भाजपाला पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचे वाटप करावे लागले.

भाजपाकडून पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचे वाटप
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 - तिकीट वाटपावरुन राडा झाल्यामुळे शुक्रवारी रात्री भाजपाला पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचे वाटप करावे लागले. नाराज कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि संदीप लेले यांनाच थेट धक्काबुक्की केली. भाजपाच्या खोपट येथील मुख्य कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना नौपाडयात अगदी ऐनवेळी मनसेतून भाजपात आलेल्या प्रतिमा मढवी आणि मृणाल पेंडसे यांना तिकीट देण्यात आल्यामुळे गुरुवारी रात्री याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण तसेच शहराध्यक्ष संदीप लेले यांनाच काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्यामुळे रात्री 11.30 वाजेनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये तिकीट वाटपाची प्रक्रिया भाजपाच्या नेत्यांना करावी लागली. त्यामुळे रात्रभर याठिकाणी तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे गुरुवारी सायंकाळपासूनच अनेक इच्छुकांनी भाजपाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.
त्यातच व्हॉटसअॅपवरुन काही उमेदवारांच्या याद्या फिरल्याने ज्यांची नावे या यादीत नव्हती त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. अनेकांनी या कार्यालयाकडे रात्री एक नंतर धाव घेतली. जे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना एबी फॉर्मचे वाटप शहर अध्यक्ष लेले आणि नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडून सुरु होते.
तितक्यात नौपाड्यातील प्रभाग 21 अ मधून संजय वाघुले, ब - मध्ये मनसेतून अलिकडेच भाजपामध्ये दाखल झालेल्या प्रतिमा मढवी, मृणाल पेंडसे आणि सुनेश जोशी यांची नावं जाहीर झाल्यानंतर वाघुले आणि जोशी या दोन नावांव्यतिरिक्त मढवी आणि पेंडसे या दोन नावांना कार्यकर्त्यांनी विशेषत: महिलांनी जोरदार आक्षेप घेतला.
हा गोंधळ इतका वाढला की, चव्हाण आणि लेले यांना तर काहींनी धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर एबी फॉर्म देण्याची प्रक्रीया काही काळ थांबविण्यात आली. नंतर तिथेच असलेल्या चव्हाण यांच्या अंगरक्षकांनी लेले यांच्या कॅबिनला बाहेरुन लॉक केले. त्यानंतर बंद कुलपात आत काही सशस्त्र पोलिसांच्या संरक्षणात ही एबी फॉर्म वाटपाची प्रक्रिया काहीशा तणावपूर्ण वातावरणात रात्री उशिरार्पयत सुरु होती.
ऐनवेळी तिकीट कापल्याने बंडखोरी
पक्षातून प्रभाग क्रमांक 13 अ साठी कैलास पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली असतांना त्यांना शुक्रवारी सकाळपर्यंत एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या भरत पडवळ यांना उमेदवारी देण्यात आल्याने पाटील यांनीबंडखोरी करत काँग्रेसमधून उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला.