ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसह कुळगाव बदलापूरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील
By पंकज पाटील | Updated: July 16, 2022 15:38 IST2022-07-16T15:38:19+5:302022-07-16T15:38:43+5:30
कुळगाव बदलापूर नगर पालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले असून तीन स्वीकृत नगरसेवक आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसह कुळगाव बदलापूरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील
बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर पालिकेतील शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला. या सोबतच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनीदेखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
कुळगाव बदलापूर नगर पालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले असून तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनीदेखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरातील वामन म्हात्रे गट हा नेमका उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शुभेच्छा बॅनरवर देखील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्यात आले होते, अशा परिस्थितीत शनिवारी सकाळी म्हात्रे गटाने आपल्या नगरसेवकांसह शिंदे गटाला समर्थन दर्शविले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात गेल्याने बदलापुरात शिवसेनेला मोठे खिंडार पडली आहे. नगरसेवकांसोबतच शहरातील अनेक पदाधिकारी देखील शिंदे सोबत गेले आहेत.