वर्षभरात पालिकेच्या सर्व सेवा होणार आॅनलाइन
By Admin | Updated: March 23, 2017 01:28 IST2017-03-23T01:28:12+5:302017-03-23T01:28:12+5:30
येत्या वर्षभरात महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या सेवा आॅनलाइन करण्याचा निर्धार पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे.

वर्षभरात पालिकेच्या सर्व सेवा होणार आॅनलाइन
ठाणे : येत्या वर्षभरात महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या सेवा आॅनलाइन करण्याचा निर्धार पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. यापूर्वीच महापालिकेच्या ९ सेवा आॅनलाइन केल्या असून टप्प्याटप्प्याने उर्वरित सेवादेखील आॅनलाइन केल्यानंतर कोणत्याही नागरिकाला आपल्या समस्या घेऊन पालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने सुरू केलेल्या जलमित्र अॅपचे उद्घाटन बुधवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पालिका आयुक्तांनी पालिकेच्या सर्वच सेवा आॅनलाइन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काही काळात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून संपूर्ण यंत्रणाच आॅनलाइन करण्यात येणार आहे.
पाणी विभाग अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पाच घटकांचा विकास होणार असून यामध्ये वॉटर आणि एनर्जी आॅडिट, वॉटर कियोस्क, स्मार्ट मीटरिंगचा समावेश आहे. पाण्यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन कसे होईल, याचेही प्रयत्न होणार असल्याचे सांगितले. येत्या वर्षभरात महापालिकेच्या २८ पेक्षा अधिक सेवा आॅनलाइन होणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)