रिक्षाचालकांची सर्व माहिती उपलब्ध, मग ऑनलाईन लिंकचा फार्स कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:06+5:302021-05-25T04:45:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये देण्याचे जाहीर करून प्रक्रिया सुरू ...

रिक्षाचालकांची सर्व माहिती उपलब्ध, मग ऑनलाईन लिंकचा फार्स कशाला?
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये देण्याचे जाहीर करून प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी दिलेल्या ऑनलाइन लिंकमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तांत्रिक बाबी बाजूला ठेवून आरटीओकडे उपलब्ध असलेल्या रिक्षाचालकांच्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यावर विनाविलंब पैसे जमा करावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली आहे.
माळेकर यांनी रविवारी परिवहनमंत्री अनिल परब यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. माळेकर त्यात म्हणतात की, कल्याण, ठाणे परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडे रिक्षाचालकांची सर्व माहिती उपलब्ध आहे. मग एवढा खटाटोप कशासाठी? रिक्षाचालकाचे बँक खाते मागवून त्यावर त्वरित रक्कम अदा केल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल. ऑनलाइन साइट बहुतेक बंद असते. हँग होणे, स्लो चालणे असे प्रकार घडत आहेत. सकाळी ८ ते १० ही त्याची वेळ आहे. कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांनी पोटाची खळगी भरायची की दोन-दोन दिवस रांगेत उभे राहायचे? लॉकडाऊनमुळे जाहीर झालेली ही मदत कोविड काळात वेळेत मिळाली नाही तर शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा उपयोग काय? सरकारने ही मदत या महिन्यात आम्हाला नाही दिली तर सर्व अनलाॅक करून आम्हाला मोकळे करावे व आम्हाला दिलेले १५०० शासनाने आघाडीतील प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे वाटून घ्यावे, असा टोला माळेकर यांनी लगावला आहे.