बालरोग, नवजात शिशू देखभाल युनिटसाठी सव्वाकोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:30+5:302021-05-25T04:45:30+5:30
कल्याण : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

बालरोग, नवजात शिशू देखभाल युनिटसाठी सव्वाकोटींचा निधी
कल्याण : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कायमस्वरूपी बालरोग विभाग सुरू करण्यासाठी एक कोटी २५ लाख रुपयांचा खासदार निधी देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेत त्यांना हा निधी केडीएमसीकडे वर्ग करावा, अशी सूचना केली.
कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनीता राणे, माजी नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणे, राजेश कदम, राहुल लोंढे या भेटीच्या वेळी उपस्थित होते.
कोरोनाचा धोका ओळखून लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे, त्यांना समर्पित नवजात आयसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. त्यांच्याकरिता एनआयसीयू युनिट अत्याधुनिक असते. प्रत्येक नवजात वेगळा असतो. त्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. नवजात शिशू देखभाल युनिट, ज्याला इन्टेसिव्ह केअर नर्सरीदेखील म्हटले जाते. त्यासाठी डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात ४० ते ५० बेडचा बालरोग विभाग, १० बेडचा अतिदक्षता विभाग, १० बालरोग व्हेंटिलेटर, बालरोग उपकरणे, प्राणवायू वाहिन्या अशा प्रकारे हा बालरोग विभाग सुसज्ज असावा, असे निर्देश खासदारांनी महापालिकेस दिले आहेत.
दरम्यान, हा विभाग कोरोना काळापुरता राहणार नाही, तर त्यानंतरही हा विभाग कार्यान्वित असेल. बालकांच्या उपचारासाठी कायमस्वरूपी हा विभाग तयार होईल. त्याचा फायदा शहरी भागासह आसपासच्या ग्रामीण भागातील बालकांच्या उपचारासाठी होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
-----------------------