पोलीस भरती पूर्व परीक्षेत अजय प्रथम
By Admin | Updated: April 24, 2017 02:20 IST2017-04-24T02:20:14+5:302017-04-24T02:20:14+5:30
ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांतर्गत टोकावडे पोलीस ठाण्यामार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला

पोलीस भरती पूर्व परीक्षेत अजय प्रथम
मुरबाड : ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांतर्गत टोकावडे पोलीस ठाण्यामार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला यश आले असून नुकत्याच झालेल्या भरती पूर्व परीक्षेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेतून रामपूर येथील अजय जावळे हा पहिला आला असून त्याला २०० पैकी १८२ गुण मिळाले. हे प्रशिक्षण सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय धुमाळ देत आहेत.
टोकावडे पोलीस ठाण्यांतर्गत येणारा बहुतांश विभाग मागास क्षेत्र असून येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील तरुण जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेतात, तेही शासकीय आश्रमशाळा आसपास असल्यामुळे. त्यामुळे अनेक आदिवासी, गोरगरिबांची मुले अर्धवट शिक्षणामुळे नोकरी-धंद्यापासून वंचित राहतात. मात्र, दोनच वर्षांपूर्वी टोकावडे पोलीस ठाण्यातील अधिकारी पंकज गिरी आणि विजय धुमाळ यांनी या तरुणांना भरपूर मेहनत घेऊन पोलीस व्हा, असा सल्ला दिला. केवळ एवढेच नाही, तर दोन वर्षांपासून टोकावडे व परिसरात मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केले. उपनिरीक्षक विजय धुमाळ स्वत: या मुलांना पहाटे ५ पासून प्रशिक्षण देतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून धसई परिसरातून रामपूर येथील अतिशय गरीब घरातील अजय जावळे नवी मुंबई तुरुंगासाठी झालेल्या पोलीस भरतीत अनुसूचित जागेतून २०० पैकी १८२ गुण मिळवून पहिला आला, तर मोहन खंडवी हा पालघर पोलिसांत भरती झाला. (वार्ताहर)