हवेतील प्रदूषण हे श्वसनविकार, हृदयविकार असलेल्या लोकांसाठी धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:38 PM2021-01-09T19:38:34+5:302021-01-09T19:39:33+5:30

Air Pollution : हवा  प्रदूषणाने माणसाच्या श्वसनसंस्थेला पहिला फटका बसतो.

Air pollution is dangerous for people with respiratory and heart problems | हवेतील प्रदूषण हे श्वसनविकार, हृदयविकार असलेल्या लोकांसाठी धोकादायक

हवेतील प्रदूषण हे श्वसनविकार, हृदयविकार असलेल्या लोकांसाठी धोकादायक

googlenewsNext

मीरारोड - मीरा-भाईंदरसह मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे नवी मुंबईतील हवेचा दर्जा अती वाईट स्तरावर पोहचला असल्यामुळे शहरातील श्वसनविकार तसेच हृदय विकार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यातच अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यामुळे सफर या संस्थेच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या आठ केंद्रांपैकी पाच केंद्रावर अती वाईट म्हणजेच अतीप्रदूषित नोंदविण्यात आले आहे. 

हवा  प्रदूषणाने माणसाच्या श्वसनसंस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. प्रदूषित वातावरणात वास्तव्य असलेल्या लोकांना तुलनात्मकदृष्टय़ा हृदयविकाराचे वारंवार झटके येत राहतात, याविषयी अधिक माहिती देताना हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले कि , " भारतात शहरातील  लोकसंख्येने मर्यादेची एक सीमा ओलांडली असून आपल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुख्यतः मुंबई व दिल्लीत  वायू प्रदूषण वाढत आहे परंतु आपल्याकडे या वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांची गंभीरता लोकांमध्ये नाही. 

प्रदूषित हवेत चालणारे नागरिक फुफ्फुसापेक्षा हृदयविकारांचे मोठ्या प्रमाणात बळी ठरतात. हवेतील प्रदूषके शरीरात सुपरऑक्सिडाईज्ड रेणूची वाढ करतात व ते शरीरपेशीचा विध्वंस करतात. त्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि त्याहीपेक्षा रक्तवाहिन्या व हृदयाला इजा पोहचते. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात. हवेच्या प्रदूषणासंबंधी जी काटेकोर प्रमाणे ठरविलेली आहेत, त्या प्रमाणातील प्रदूषकांमुळेसुद्धा शरीराला इजा पोहचते. शहरात हवेचे प्रदूषण भरमसाठ होत असते व तिथे वास्तव्य करणारे नागरिक हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरतात. यावर जर्मनीतल्या संशोधनाने शिक्कामोर्तब केले आहे. 

शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्प, रस्त्याची कामे, नवीन बांधकामे , मेट्रोची कामे यातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अ‍ॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्त वाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा विपरीत परिणाम हृदयरोग बळावण्यात होतो. हृदयविकार आणखी बळावू नये म्हणून हृदयविकार असलेल्या नागरिकांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे आहे." असे डॉ . तारळेकर म्हणाले . 

हवेतील वायू प्रदूषणासोबतच घरात होणारे प्रदूषण श्वसन विकाराला कारणीभूत ठरत आहेत. छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल म्हणाले की, घरामध्ये मारले जाणारे स्प्रे, परफ्युम्स, झोपताना मच्छर मारण्यासाठी जाळल्या जाणा‍ऱ्या अगरबत्ती तसेच कॉइल्समुळे होणारे प्रदूषण मुलांच्या थेट फुफ्फुसावर परिणाम करीत आहे. एका सिगारेटमुळे जितकी हवा प्रदूषित होते त्याच्या चारपट प्रदूषण हे डास मारण्यासाठी वापरल्या जाणा‍ऱ्या स्प्रेमध्ये तसेच  डासांसाठी जाळल्या जाणा‍ऱ्या कॉइल्समध्ये असते. चाळी तसेच झोपडपट्ट्यांमध्ये आजही पाणी तापवण्यासाठी, जेवण करण्यासाठी जाळ केला जातो, त्यातून मुलांच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो."  हवा जीवनाचा पाया आहे निरोगी राहण्यासाठी स्वच्छ हवा आवश्यक आहे. हवेच्या संरचनेत झालेला  बदल आरोग्यासाठी एक गंभीर धोका बनला आहे. 

भारतात प्रदूषण सर्वात धोकादायक पैलू असून आम्ही प्रदूषण विरुद्ध लढ्यात जगातील इतर देशांच्या तुलनेत मागे आहोत. २०१९ साली भारतातील वायू प्रदूषणाने १७ लाख नागरिकांचा बळी घेतला असून कोरोना संक्रमण काळात आपण सहा महिने वायू प्रदूषण थांबवू शकलो हीच फक्त आपली जमेची बाजू आहे.

 

Web Title: Air pollution is dangerous for people with respiratory and heart problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.