बदलापूरमध्ये आता ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’

By Admin | Updated: March 24, 2017 01:09 IST2017-03-24T01:09:36+5:302017-03-24T01:09:36+5:30

बदलापूरमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली. हे प्रमाण कमी करण्यासाठी बदलापूर पालिकेने पुढाकार

'Air monitoring system' now in Badlapur | बदलापूरमध्ये आता ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’

बदलापूरमध्ये आता ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’

पंकज पाटील / बदलापूर
बदलापूरमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली. हे प्रमाण कमी करण्यासाठी बदलापूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणी ठोस पावले उचलत नसल्याने आता पालिकेने शहरात प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. बदलापूरात पालिकेच्या वतीने ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’ उभारली जाणार आहे.
कुळगांव-बदलापूर हे शहर उल्हास नदीच्या तीरावरील निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाते. प्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याने मुंबई, ठाण्यातील नागरिकांची पहिली पसंती ही बदलापूर ठरली आहे. मात्र गेल्या महिन्यात एका संस्थेचा आलेल्या अहवालानुसार राज्यातील प्रदूषित शहरांच्या यादीत बदलापूर शहराचे नाव आल्याने बदलापूरकरांना त्या गोष्टींबाबत आश्चर्य वाटत आहे.
शहरातील प्रदूषण वाढलेच कसे याची चाचपणी आता पालिकेने सुरु केली आहे. बदलापूर शहराचे प्रदूषण खरेच वाढले आहे की या अहवालात काही त्रुटी आहे हे उघड करण्यासाठी पालिकेने आता प्रदूषण नियंत्रण मंडळावर अवलंबून न राहता शहरातील हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ‘एअर मॉनिटरिंग’ सिस्टीम उभारण्याची तयारी केली आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देखील देण्यात आली. नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी ही यंत्रणा शहरात राबविण्याची सूचना केली. त्यानुसार सभागृहात या विषयाला मंजुरी देखील मिळाली आहे.
एअर मॉनिटरिंग सिस्टीममुळे बदलापूरातील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण प्रत्येक तासाला मिळणार आहे. हे प्रदूषण अधिक आढळल्यास त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवित या संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालिका प्रशासन करणार आहे. केवळ औद्योगिक प्रदूषणाची चाचपणी केली जाणार नसून त्यात हवेतील धुळीचे प्रमाण आणि मानवी शरीराला बाधा निर्माण करणाऱ्या घातक घटकांची माहितीही घेणार आहे. त्यामुळे ही यंत्रणा उभारल्यावर नियमित पालिकेला त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. तसेच हवेतील प्रदूूषणाचे
प्रमाण वाढल्यास त्यास जबाबदार असलेल्या कंपन्या आणि संबंधित विभागावर कारवाई करण्यास मदत होणार आहे.
ही यंत्रणा उभारण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार असून त्यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. या यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार असून सरासरी आणि प्रत्येक तासाचा अहवाल हा पालिकेला उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेला सुरुवातीला २५ लाखाची गरज असून त्या खर्चास मंजुरीही देण्यात आली आहे. तसेच ही यंत्रणा उभारल्यावर वर्षाला देखभाल दुरुस्ती आणि कामगारांच्या वेतनापोटी असे एकूण ८ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आले आहे.

Web Title: 'Air monitoring system' now in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.