ठाणे: मुंबई,ठाणे,रायगड,नाशिक,पालघर मधील स्थानिकांची बोली म्हणजे आगरी बोली. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी बोली तिच्या गोडव्यामुळे आपल्याला ठाऊक आहे. परंतू अनेकांना या भाषेचे नेमके पैलु माहित नाहीत. आता ठाण्यात ज्यांना आगरी बोली शिकायची आहे, त्यांच्यासाठी भूमिपुत्र फाऊंडेश आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७,२८ मे रोजी ठाण्यात टाऊन हॉल येथे ‘आगरी शाला’ या २ दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येणार आहेत.
हे वर्ग भूमिपुत्र फाऊंडेशने अध्यक्ष सुशांत पाटील आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. काही दिवसापूर्वीच मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण, तिच्या बोलीभाषा अजूनही दुर्लक्षित आहेत. तसेच इंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी ही बोली बोलणारऱ्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत चालला आहे.
आगरी ग्रंथालय चळवळीतील सर्वेश तरे,मोरेश्वर पाटील,दया नाईक,प्रकाश पाटील यांच्या मार्फत याआधीही आगरी बोली संवर्धनार्थ आगरी शाला,आगरी ग्रंथालय असे अनेक प्रयोग केले आहेत. आगरी शाला या उपक्रमात काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे.
यामध्ये मराठी साहित्य मंडळाचे प्रा.एल बी पाटील,अग्रसेन मासिकाचे संपादक चंद्रकांत पाटील,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील,सिनेअभिनेता मयुरेश कोटकर तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघु पाठ्यक्रम असलेल पुस्तकही मिळणार आहे. यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल,याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त आगरी भाषा प्रेमींनी मग ते कोणत्याही वयोगटातले असोत त्यांनी सहभाग घ्यावा असे युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून इच्छूकांनी प्रवेशासाठी नोंदणीसाठी ०९६७२०९९९/९८८११३३४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही कार्यशाळा मोफत आहे.