छाननीत ८७ उमेदवारी अर्ज झाले बाद
By Admin | Updated: February 5, 2017 03:05 IST2017-02-05T03:05:10+5:302017-02-05T03:05:10+5:30
महापालिका निवडणुकीत एकूण दाखल १२०६ अर्जांपैकी ८७ अर्ज बाद झाले असून १११९ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. अर्ज बाद ठरणाऱ्यांमध्ये भाजपाचे
छाननीत ८७ उमेदवारी अर्ज झाले बाद
ठाणे - महापालिका निवडणुकीत एकूण दाखल १२०६ अर्जांपैकी ८७ अर्ज बाद झाले असून १११९ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. अर्ज बाद ठरणाऱ्यांमध्ये भाजपाचे संजय घाडीगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रीटा यादव आणि जितेंद्र पाटील आदींचा समावेश आहे. शिवसेनेचे लॉरेन्स डिसोझा यांच्या अर्जाबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे, तर दिलीप बारटक्के यांच्या अर्जाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, न्यायालय याचा निर्णय घेईल, असा निर्वाळा दिल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ३, ६, १५ आणि २२ मध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. कारण, या प्रभागांमध्ये तब्बल ५० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
‘अ, ब, क, ड’ अशा चार पॅनलचा एक प्रभाग अशा ३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी ठाणे महापालिकेची निवडणूक होत असून महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वच प्रभागांमध्ये चार पॅनलसाठी २० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्यामुळे प्रत्येक पॅनलमध्ये सरासरी पाच उमेदवार एकमेकांसमोर निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग क्र. १७ क चे भाजपाचे उमेदवार संजय घाडीगावकर यांचा उमेदवार अर्ज जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याच्या मुद्यावर बाद करण्यात आला. कळव्यातील प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मधून राष्ट्रवादीच्या वतीने एकाच वेळेस दोघादोघांना ए-बी फॉर्मचे वाटप केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रीटा यादव आणि जितेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज ठरवला. दुसरीकडे शिवसेनेचे लॉरेन्स डिसोझा यांचा उमेदवारी अर्ज जातप्रमाणपत्राच्या मुद्यावर रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, आता सोमवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. वर्तकनगर भागातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप बारटक्के यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी आणि भाजपाने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. परंतु, अखेर याचा निर्णय न्यायालयच घेईल, अशी भूमिका निवडणूक विभागाने घेतल्याने तूर्तास बारटक्के यांना दिलासा मिळाला आहे. बंड थोपवण्याकरिता शिवसेनेची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून काही अंशी त्यात शिवसेनेला यश आले आहे. (प्रतिनिधी)