दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा

By Admin | Updated: June 21, 2016 01:20 IST2016-06-21T01:20:11+5:302016-06-21T01:20:11+5:30

रस्ता रूंदीकरणाची कारवाई एकतर्फी सुरू असल्याचा आरोप करून वेगवेगळ््या संघटनांनी सोमवारी काढलेला मोर्चा निघू नये, यासाठी भाजपाने वेगवेगळ््या मार्गने दबाव आणला खरा

After the press, a grand front | दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा

दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा

मीरा रोड/भाईंदर: रस्ता रूंदीकरणाची कारवाई एकतर्फी सुरू असल्याचा आरोप करून वेगवेगळ््या संघटनांनी सोमवारी काढलेला मोर्चा निघू नये, यासाठी भाजपाने वेगवेगळ््या मार्गने दबाव आणला खरा, पण त्यानंतरही मोर्चा निघाला. प्रमुख संघटना असलेल्या स्टिल असोसिएशनने आयत्यावेळी मोर्चातून माघार घेतली, तर मोर्चात सहभागी झालेल्या आपल्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याने भाजपाच्या गटनेत्याविरू्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्य व्यापारी संघटनांसह रहिवासी संघाने भार्इंदरच्या गोडदेव नाक्यावरुन खारीगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढत पालिकेच्या तोडफोड कारवाईचा निषेध केला. भाजपाकडून दबाव टाकला जात असतानाही पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील त्यात सहभागी झाले.
मीरा-भार्इंदरमधील रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरली आहे. सत्ताधारी भाजपाच्या सहमतीने सुरु असलेल्या या रुंदीकरणात मनमानीपणे घरे, गाळे तोडले जात असल्याने असंतोष पसरला आहे. आधी मोबदला किंवा पर्यायी जागा न देताच कारवाई सुरू आहे. आदल्या दिवशी यायचे, लाल मार्किंग करुन जायचे आणि दुसऱ्या दिवशी बाऊन्सर, पोलीस आदी फौजफाट्यासह सरळ बांधकाम तोडायला यायचे अशी कार्यपध्दती पालिकेने अवलंबल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. फेरीवाले, हातगाडीवाले हटवून रस्ते-पदपथाचा अडथळा दूर करण्याऐवजी पालिका मात्र जुनी-राहती बांधकामे तोडत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.
त्यातच जुन्या औद्योगिक वसाहतींवरही हातोडा चालवण्यास घेतल्याने विविध व्यापारी संघटनांनी‘मिरा-भार्इंदर बचाव समिती’ स्थापन करत पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. नागरिक, व्यापारी, अन्य संघटनांतील रोष पाहून धास्तावलेल्या प्रशासनासह भाजपाने मोर्चाच निघू नये, म्हणून मोर्चेबांधणी सुरु केली होती.
आयुक्त अच्युत हांगे यांनी समितीला चर्चेसाठी पाचारण करुन ज्यांचे पूर्ण बांधकाम तोडले जाईल, त्यांना पर्यायी जागा देण्यासह मूळ जमीनमालकास टीडीआर देण्याआधी बाधितांची सहमती घेतली जाईल, असे लेखी पत्र दिले होते. ते मिळताच स्टेनलेस स्टिल मॅन्युफॅक्चरर अँण्ड ट्रेडर्स असोसिएशनने माघार घेतली. पण अन्य व्यापारी संघटनांनी मात्र मोर्चाचा पवित्रा घेतल्याने समितीत फूट पडली.
गोडदेव नाक्यावरुन निघालेला जनआक्रोश मोर्चा खारीगाव नाक्यावर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. विकासाला आमचा विरोध नाही. पण लोकांना मोबदला न देता किंवा पुनर्वसन न करात पालिकेने सुरु केलेली कारवाई बेकायदा, मनमानी असून टीडीआर माफियांच्या फायद्यासाठी सुरू असल्याचा आरोप मुझफ्फर हुसेन यांनी केला. हे शहर वसताना मी पाहिले असून दादागिरी करुन कोणी ते उद््ध्वस्त करत असेल, तर ते सहन करणार नाही, असा इशारा रोहिदास पाटील यांनी दिला.
काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन, गटनेते जुबेर इनामदार, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल, निर्भय भारतचे अंकुश मालुसुरे, कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. किशोर सामंत, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर, भारिपचे अनील भगत आदींसह विविध व्यापारी संघटना मोर्चात
उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
भाजपाची मोर्चेबांधणी
हा मोर्चा निघू नये म्हणून भाजपा व प्रशासनाकडून मोर्चेबांधणी सुरु होती. भाजपाचे पदाधिकारी तसेच बफिंग असोसिएशनचे अध्यक्ष असलेले शैलेष पांडे मोर्चात फिरकलेच नाहीत. शिवसेनेच्या नगरसेवकांनादेखील भाजपा नगरसेवकांकडून मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून फोन केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या स्टेनलेस स्टिल मॅन्युफॅक्चरर अँण्ड ट्रेडर्स असोसिएशनने माघार घेतली, त्याचे अध्यक्ष राजेंद्र मित्तलदेखील भाजपाचे पदाधिकारी आहेत.

भाजपाचा कार्यकर्ता व रोहिदास पाटील यांचा समर्थक उत्तम पुरोहित हा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी थांबला असता भाजपाचेच गटनेते शरद पाटील यांनी त्यास मोर्चात सहभागी होऊ नको, असे बजावले. त्यावर पुरोहित यांनी परिचित व नातलगांचे नुकसान झाल्याने मोर्चात सहभागी होणार, असे सांगताच पाटील यांनी त्यास कानाखाली मारत शिवीगाळ आणि दमदाटी केली. मोर्चामध्ये उत्तम याने ही बाब भाषणात सांगितल्याने जमाव संतप्त झाला. सर्वांनी नवघर पोलीस ठाण्यावर मोर्चा वळवला. पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: After the press, a grand front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.