मुसळधार पावसानंतर कट्ट्यावर कलाकृतींची बरसात
By Admin | Updated: June 28, 2017 03:17 IST2017-06-28T03:17:43+5:302017-06-28T03:17:43+5:30
शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत कट्टा आणि सभोवताली सुमारे १ फुटभर पाणी असूनही अभिनय कट्टयाच्या

मुसळधार पावसानंतर कट्ट्यावर कलाकृतींची बरसात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत कट्टा आणि सभोवताली सुमारे १ फुटभर पाणी असूनही अभिनय कट्टयाच्या कलाकारांनी निराश न होता एकत्र येत पाणी उपसून काढले. आणि कट्टयावरचे प्रेम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या काही तासांनी सायंकाळी कट्टयावर एकापेक्षा एक सरस कलाकृतींची बरसात करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
रविवारच्या पावसाने कट्टा आणि कट्टयाच्या कार्यालयातही पाणी साचले होते. मात्र, सर्व कलाकारांच्या एकजुटीमुळे रविवारी सायंकाळीही ३३० वा कट्टा रंगला. रसिकांना अभिनय कट्ट्यावर फिल्मी चक्कर अंतर्गत फिल्मी संडे अनुभवता आला. फिल्मी चक्कर या सदरामध्ये चंदेरी दुनियेतील आईना, जुदाई, वजूद, गब्बर, शेहनशाह अशा प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
अर्चना वाघमारे आणि शिवानी देशमुख यांनी आईना या चित्रपटातील प्रसंग सादर केला तर तन्नू वेड्स मन्नू चित्रपटातील मनू आणि तनुची भूमिका अनुक्रमे आदित्य नाकती आणि वीणा छत्रे यांनी साकारत उपस्थितांची दाद मिळवली. मुगल - ए - आजम चित्रपटातील प्रसंग अभिषेक जाधव आणि सुरज परब यांनी दमदाररित्या सादर केले. जुदाई या चित्रपटातील प्रसंग श्रावणी कदम, रु क्मिणी कदम, प्रतीकेश मोरे, स्वप्नील काळे या कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फिल्मी चक्करमधील हास्यविनोद असेच सुरु राहिले ते वैभव जाधव आणि हितेश नेमाडे यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील सादर केलेल्या प्रसंगांमुळे.
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘वजूद’ या चित्रपटातील क्लायमॅक्स स्वप्नील काळे आणि विणा छत्रे यांनी रंगविला. तर ज्या चित्रपटाशिवाय हिंदी चित्रपटाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही असा शोले हा प्रसिद्ध चित्रपट कलाकारांनी १५ मिनिटांत कट्टयावर उभा केला. यामध्ये नवनाथ कंचार, स्वप्नील माने , कल्पेश डुकरे, दीपक मुळीक, शुभांगी गजरे यांनी विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.