आठ महिन्यांनंतर माथेरान पर्यटकांनी बहरले, स्थानिक नागरिक सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 01:35 AM2020-11-18T01:35:46+5:302020-11-18T01:35:55+5:30

दिवाळीचा समाधानकारक हंगाम : शटल सेवेच्या फेऱ्यांत वाढ, खासगी वाहनांमुळे  वन व्यवस्थापन समितीचे वाहनतळ गेले भरुन

After eight months, Matheran tourists flourished, locals rejoiced | आठ महिन्यांनंतर माथेरान पर्यटकांनी बहरले, स्थानिक नागरिक सुखावले

आठ महिन्यांनंतर माथेरान पर्यटकांनी बहरले, स्थानिक नागरिक सुखावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत :  माथेरान हे पर्यटन स्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच आठ महिन्यांनंतर माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पाहावयास मिळाली. पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर सुखावला आहे. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी मिनिट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्यात आली असून, २२ नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या आठ फेऱ्या असणार आहेत.


दिवाळीचा पर्यटन हंगाम हा माथेरानचा प्रमुख हंगाम मानला जातो. कोविड १९ काळात पर्यटक माथेरानला भेट देतील की नाही, अशी शंका माथेरानकरांना भेडसावत होती, पण पर्यटकांनी माथेरानवरचे प्रेम अबाधित ठेवत माथेरानला एकच गर्दी केली. हॉटेल, लॉजिंग, पॉइंट सर्व पर्यटकांनी बहरले आहे. त्यामुळे गेली आठ महिने शांत असणारे माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पर्यटकांनी माथेरानकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात केली. उपनगरीय लोकल सेवा बंद असल्याने येणारे पर्यटक हे आपल्या खासगी वाहनाने माथेरानकडे येऊ लागले.

 
पर्यटकांची खासगी वाहने यांच्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचे वाहनतळ असलेल्या एकमेव वन विभागाचे आणि वन व्यवस्थापन समितीचे वाहनतळ वाहनांनी भरून गेले. त्यामुळे वाहनतळ सांभाळणारे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. 
चारशे चारचाकी वाहने आणि पाचशे पन्नासपेक्षा अधिक वाहने उभी राहिली, तरीही पार्किंगसाठी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई गुलाब भोई यांनी कार्य तत्परता दाखवत ट्राफिक सुरळीत करून पर्यटकांना मदतीचा हात दिला. 


त्यामुळे काही पर्यटकांचा वेळ वाचला, तर वाहनतळावर वाहने येत असल्याने पर्यटकांना तेथील कर्मचारी वर्गाकडूनचा वाहने व्यवस्थित लावण्यासाठी मदत दिली जात होती.
मात्र, त्यावेळी एमएमआरडीएच्या ठेकेदारांच्या कामचुकारपणाचा फटका माथेरानच्या पार्किंग व्यवस्थेला बसला. पार्किंगमधील अर्धवट काम असल्यामुळे ६०० गाड्यांची पार्किंग व्यवस्थेत फक्त चारशे वाहनेच उभी राहिली. 
मात्र, ज्यांना पार्किंगमध्ये जागा मिळाली नव्हती, त्यांना पार्किंग व्यवस्थापक राहुल बिरामणे आणि वनपाल गोपाळ मराठे यांनी धीर देत, त्यांना पार्किंगमध्ये जागा उपलब्ध करून दिली. पर्यटक आल्याने स्थानिक व्यावसायिकांची हाेणारी उपासमार टळली आहे.


व्यावसायिकांना दिलासा, अगाेदरच करण्यात आले हाॅटेलचे बुकिंग
nलॉकडाऊननंतर आर्थिक कंबरडे मोडलेल्या माथेरानच्या हॉटेल इंडस्ट्रीला या दीपावली पर्यटन हंगामात थोडासा दिलासा मिळाला आहे. दिवाळी हंगामात हॉटेलच्या बुकिंग अगोदरच झाल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना वेळेवर आपल्या इच्छित स्थळी जाणे शक्य झाले. माथेरानला आठ महिन्यांनंतर समाधानकारक पर्यटक दिसत आहेत. हे त्यांचं माथेरानवरील प्रेम आहे. पर्यटकांनी माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेताना शासनाने दिलेल्या निकषांचे पालन करावे. 
nकोविड अजून संपलेला नाही आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषद नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे. माथेरानमध्ये आठ महिने पर्यटक नव्हते. आमची आर्थिक घडी विस्कटलेली होती, पण दिवाळी पर्यटन हंगामात शनिवार व रविवारी पर्यटक दाखल झाल्याने आम्हाला थोडासा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे पर्यटकांनी आणि व्यावसायिक यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत.


मिनिट्रेन शटल हाउसफुल
शनिवार व रविवार अप व डाउन मार्गावर प्रत्येकी चार चार फेऱ्या धावणाऱ्या अमन लॉज-माथेरानच्या शटल सेवेच्या फेऱ्या पर्यटकांनी भरून धावत होत्या. त्यामुळे २२ नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या रोज अप-डाउन मार्गावर आठ फेऱ्या होणार आहेत, असा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचा फायदा या पर्यटन हंगामात माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला उभारी आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

Web Title: After eight months, Matheran tourists flourished, locals rejoiced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.