तब्बल ९ वर्षांनी मिळाला गुलामनबीला न्याय
By Admin | Updated: March 24, 2017 01:08 IST2017-03-24T01:08:23+5:302017-03-24T01:08:23+5:30
गेल्या नऊ वर्षांपासून स्वत:च्या जागेत झालेले बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणाऱ्या गुलामनबी सय्यद

तब्बल ९ वर्षांनी मिळाला गुलामनबीला न्याय
भार्इंदर : गेल्या नऊ वर्षांपासून स्वत:च्या जागेत झालेले बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणाऱ्या गुलामनबी सय्यद या जागामालकाला आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी अखेर न्याय दिल्याने दिलासा लाभला आहे. मात्र, सय्यद यांच्या जागेवर पालिकेने बांधलेला रस्ता हटवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
मीरारोडच्या नयानगर परिसरात गुलामनबी यांच्या मालकीची सुमारे १ हजार ५० चौरस मीटर जागा आहे. सर्व्हे क्रमांक ५२० हिस्सा २ मध्ये असलेल्या जागेलगत सेन्चुरी पार्क व ड्रीम एकर्स या इमारतींचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान, या रस्त्यावर लगतच्याच प्रीमियम इमारतीच्या सोसायटीचे कार्यालय २००८ मध्ये थाटण्यात आले. त्या कार्यालयाचा काही भाग गुलामनबी यांच्या जागेत बांधण्यात आला. त्याविरोधात त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावासह भ्रष्ट अधिकाऱ्यांंच्या गैरकारभामुळे दुर्लक्षित करण्यात आली. अखेर, गुलामनबी यांनी २०१२ मधील ‘लोकशाही दिना’त तक्रार करून न्यायाची मागणी केली. यानंतर, पालिकेने प्रीमियम सोसायटीला ते बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली. सोसायटीने बांधकाम हटवणे तर दूरच राहिले, उलट पालिकेकडे ते बांधकाम नियमित करण्याचा अर्ज केला. परंतु, पालिकेने त्याला नकार दिल्याने सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही ते बांधकाम अवैध ठरवले. तरीदेखील पालिकेने ते बांधकाम हटवले नाही. तसेच तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरही निगरगट्ट अधिकाऱ्यांनी त्या आदेशांना केराची टोपली दाखवली. गुलामनबी यांनी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्त व कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. तरीही, कारवाई होत नसल्याने गुलामनबी यांनी कोकण आयुक्तांच्या ‘लोकशाही दिना’त तक्रार दाखल केली. त्यावर, २०१५ मध्ये कोकण आयुक्तांनी पालिकेला ते बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले. तरीही, कारवाई झाली नाही.
पालिकेकडे सतत तक्रारी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने गुलामनबी व त्यांचे कुटुंब हताश झाले होते. न्यायाच्या आशेने ते मुलांसोबत दररोज जोगेश्वरी येथून पालिकेत पायपीट करीत होते. अखेर, ६ मार्चला पार पडलेल्या ‘लोकशाही दिना’त त्यांनी तक्रार करून पुनश्च प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. आयुक्त डॉ. गीते यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख दीपक पुजारी यांना ते बांधकाम दोन दिवसांत हटवण्याचे निर्देश दिले. अखेर, त्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरला आणि तब्बल ९ वर्षांनंतर गुलामनबी यांना न्याय मिळाला.
दरम्यान, ड्रीम एकर व सेन्चुरी पार्क या इमारतींकडे जाणारा रस्ता सर्व्हे क्रमांक ५२० हिस्सा २ वर प्रस्तावित असताना गुलामनबी यांच्या जागेत हा रस्ता बांधला. (प्रतिनिधी)