आदित्य रानडे, मलय महाजन राज्यात चौथे
By Admin | Updated: June 29, 2017 02:49 IST2017-06-29T02:49:36+5:302017-06-29T02:49:36+5:30
पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत पाटकर विद्यालयातील

आदित्य रानडे, मलय महाजन राज्यात चौथे
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत पाटकर विद्यालयातील इयत्ता पाचवीतील मलय महाजन व आठवीतील आदित्य रानडे राज्यात चौथे आले आहेत. तर, सिस्टर निवेदिता शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आकांक्षा केळकर ग्रामीण भागातून ठाणे जिल्ह्यात प्रथम आली.
२६ फे बु्रवारीला ही परीक्षा झाली होती. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सरकारने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली आहे. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चौथी व सातवीत घेतली जात होती. या परीक्षेत मलयला ९४.६३ टक्के, आदित्यला ९३.८७ टक्के आणि आकांक्षाला ८१.६३ टक्के गुण मिळाले आहेत.
नांदिवलीला राहणाऱ्या मलयला सतत शिक्षकांचे प्रोत्साहन मिळते. तसेच त्यांची आवड यामुळे तो पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेला बसला होता. याशिवाय, वेगवेगळ्या परीक्षा मलय नेहमी देतो. यापूर्वी त्याने प्रज्ञा प्रावीण्य शोध परीक्षा, करकरे स्पर्धा, आयटीएम परीक्षा दिल्या आहेत. या परीक्षेतूनही त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे. पण, सरकारकडून यंदा शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
राजाजी पथ येथे राहणाऱ्या आदित्यला शाळेच्या परीक्षेत नेहमी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळतात. यंदा तो नववीत असल्यामुळे होमी भाभा परीक्षा देणार आहे. यापूर्वी तो चौथीत असताना त्याने शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्या वेळी ३०० पैकी २८४ गुण मिळवत त्याने राज्यातून आठवा येण्याचा मान मिळवला होता. सरकारतर्फे त्याला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला आहे. आदित्यला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.
आकांक्षा ही सिस्टर निवेदिता शाळेत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ही ती प्रथम आली होती. डोंबिवली शहर हे शहरी भागात येत असले तरी सिस्टर निवेदिता शाळा आजदे गावात असल्याने या शाळेला ग्रामीण भागात धरले जाते.