कुंभमेळा यात्रेकरूंवर काळाचा घाला
By Admin | Updated: September 29, 2015 23:41 IST2015-09-29T23:41:08+5:302015-09-29T23:41:08+5:30
कुंभमेळ्यासाठी झारखंड येथून आलेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात २ ठार तर १४ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास

कुंभमेळा यात्रेकरूंवर काळाचा घाला
कसारा : कुंभमेळ्यासाठी झारखंड येथून आलेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात २ ठार तर १४ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा-उंबरमाळी पॉवर हाऊस येथे घडली.
झारखंडमधील चैनपूर जिल्ह्यातून १५ जणांचा ग्रुप नाशिक येथे शाहीस्नानासाठी आला होता. २५ सप्टेंबरला शाहीस्रान आटोपून हे भाविक दुसऱ्या दिवशी शिर्डी-शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी गेले. त्यानंतर, रविवारी रात्री १० वा. शिर्डीहून साई निर्माण ट्रॅव्हल्सची मिनीबस भाड्याने घेऊन मुंबई दर्शनासाठी निघाले.
मुंबई दर्शन करून मुंबईहूनच झारखंडसाठी परतीच्या प्रवासाचे तिकीट असलेल्या या भाविकांची बस भरधाव वेगात कसाऱ्याहून जात असताना चालक बाबुराव घोरपडे, रा. नगर यांचा गाडीवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या (बंद पडलेल्या) रेतीच्या ट्रकवर जाऊन आदळली. यात बसचा पूर्ण चक्काचूर झाला.
यात बसमधील अमरप्रसाद गुप्ता (५२), गायत्रीदेवी गुप्ता (५०) हे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर चालक बाबुराव घोरपडे यांच्यासह चंपादेवी, फुलवंतीदेवी, नवलकिशोर, गायत्रीदेवी, शारदा कुंवर, कलावतीदेवी, प्रदीप शर्मा, अवंतकुमार कुंवर, पार्वती कुंवर यांच्यासह अन्य चार जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना नाशिक सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)