पर्यटनातून ‘भारत जोडो’
By Admin | Updated: November 17, 2016 06:56 IST2016-11-17T06:56:37+5:302016-11-17T06:56:37+5:30
पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही.

पर्यटनातून ‘भारत जोडो’
कल्याण : पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही. सामाजिक बांधीलकीतून हे काम हाती घेतले आणि आता त्याचा परिणामही दिसत असल्याचे आत्माराम परब यांनी सांगितले. सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘देशभक्तीपर पर्यटन’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इतिहास संशोधक सदाशिव टिटविलकर, अतुल गुरू, संस्थेचे दीपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
परब यांनी लेह-लडाख येथे १०० हून अधिक वेळा सहली आयोजित क रून २५ हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना सहल घडवून आणली आहे. व्यवसाय करणे, हे उद्दिष्ट असते तर नोकरी कधीच सोडली नसती. वेगळं काहीतरी करायचं एवढंच मनात होते. त्यातूनच, हिवाळ्यातील हे पर्यटन आम्ही विकसित केले. त्यामुळे लडाख येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सर्वांनी एकदा तरी लडाखला भेट द्यावी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.
परब पुढे म्हणाले, मला फिरण्याची खूप आवड होती. उन्ह्याळ्याच्या सुटीत मामाच्या गावी जात असे. त्यातूनच निसर्गात भटकण्याची आवड निर्माण झाली. नोकरी करीत असताना ट्रेकिंगला जात असे. यातूनच या पर्यटन व्यवसायात आलो. त्यातून आवड जोपासता आली. कोणत्याही परिस्थितीत स्वत:चे नुकसान झाले तरी टूर रद्द करायची नाही, हे तत्त्व ठरवले होते.
लडाखला जात असताना येथील आर्मीशी संबंध आला. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. सैनिकांकडून आम्हाला वाचण्यासाठी काहीतरी आणून द्या, अशी मागणी होऊ लागली तेव्हा रक्षाबंधनाला पुस्तके भेट म्हणून दिली. प्रथम मराठी पुस्तके दिल्याने अमराठी सैनिकांना ती वाचण्यास त्रासदायक ठरली. म्हणून मग त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक आणि भाषिक पुस्तके उपलब्ध करून दिली.
पुढील काळात सैनिकांसाठी नाटकांचे प्रयोग ठेवले जाणार आहेत. आपण जे काम करू, त्यातून समाजहित जोपासले पाहिजे. पर्यटनातून ‘भारत जोडो’ साध्य करण्यास मदत होते. (प्रतिनिधी)