तीन धोकादायक इमारतींवर कारवाई
By Admin | Updated: June 3, 2016 01:49 IST2016-06-03T01:49:37+5:302016-06-03T01:49:37+5:30
भार्इंदर पूर्वेतील बाळाराम पाटील मार्गावरील तीन धोकादायक इमारती पालिकेने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या

तीन धोकादायक इमारतींवर कारवाई
मीरा रोड : भार्इंदर पूर्वेतील बाळाराम पाटील मार्गावरील तीन धोकादायक इमारती पालिकेने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. या इमारतींच्या केवळ तळमजल्यावरील दुकाने वापरात होती. या वेळी काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. शिवाय, दुकानांची वाढीव बांधकामेही पाडली.
धोकादायक इमारती पाडण्याच्या नावाखाली पालिकेने येथील बाळाराम पाटील मार्ग व रेल्वेस्थानक मार्ग ६० फूट रुंद करण्याची मोहीम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले. पावसाळ्याआधी धोकादायक इमारती तोडण्याची कारवाई महापालिकेने शहरात सुरू केली असली तरी भार्इंदर पूर्वेला मात्र पालिकेने धोकादायक इमारतींच्या आड रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू केल्याचे वृत्त २४ मेच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले होते. पालिकेने रेल्वे स्थानकासमोरील बंदरवाडी नाक्यासमोर असलेल्या वसुंधरा ए व बी या धोकादायक एक मजली इमारतीवर कारवाई केली होती. त्यावेळी धोकादायक इमारतीच्या आड रस्ता रुंदीकरण मोहीम पालिका राबवत असल्याचे समोर आले होते. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, नगरसेविका कल्पना म्हात्रे, मीरा रोडचे सभापती प्रमोद सामंत यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन व त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला देऊन कारवाईचा विचार करा. मनमानी व दादागिरी करू नका, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यामुळे पर्यायी जागा वा मोबदला दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण करणार नाही, असे प्रशासनाने म्हटले होते.
दरम्यान, रेल्वे स्थानकासमोरील नारायण स्मृती या इमारतीखाली असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर पालिकेने जेसीबी चालवला. त्या वेळी ही इमारत ग्रामपंचायत काळापासूनची असल्याने जेसीबीमुळे इमारतीला धोका निर्माण होईल म्हणून नागरिकांनी विरोध केला. नंतर, मजुरांच्या मदतीने बांधकाम पाडण्यात आले. खारीगाव नाक्यावरील तुलसी निवास, मातृछाया या जुन्या इमारतींवर कारवाई करण्यात आली. या इमारतींच्या तळ मजल्यावरच काही दुकानदार आपला व्यवसाय थाटून बसले होते. या वेळी व्यवसाय जाऊन उपासमारीची वेळ येणार म्हणून काही दुकानदारांनी रास्ता रोको केला. परंतु, त्यांचा विरोध पोलिसांनी मोडून काढला.
धोकादायक म्हणून तोडलेल्या हिरापन्ना इमारतीच्या जागेत झालेली दुकाने विकास आराखड्यातील रस्त्याच्या रुंदीप्रमाणे सुमारे १० फूट मागे घेण्यासाठी तोडण्यात आली. वेतोस्कर निवास ही केवळ तळ मजला शिल्लक राहिलेली धोकादायक इमारतही पालिकेने तोडली. इमारती व बांधकामे तोडल्यानंतर तेथे लगेच रुंदीकरण करून रस्ता व गटार बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी)