भिवंडीत रिक्षाचालकांवर कारवाई
By Admin | Updated: February 11, 2017 03:50 IST2017-02-11T03:50:19+5:302017-02-11T03:50:19+5:30
भिवंडी आगारातील बसचालकास मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकां विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल केला नाही

भिवंडीत रिक्षाचालकांवर कारवाई
भिवंडी : भिवंडी आगारातील बसचालकास मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकां विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांमधील असंतोष कायम आहे. दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार ठाणे आरटीओचे पथक शुक्रवारी दुपारी आले आणि त्यांनी ६६ रिक्षांवर कारवाई केली.
बसचालक प्रभाकर गायकवाड यांचा रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याचे पडसाद ठाण्यासह राज्यातील १२ आगारात उमटले. निजामपूर पोलिसांनी गायकवाड यांच्या मृत्यूची अकस्मात नोंद केल्याने आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. मुजोर रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारे पत्र आगारप्रमुख वाय.डी.खोडे यांनी निजामपूर पोलिसांना दिले आहे अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाणे आरटीओला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे आरटीओने दुपारपासून कारवाईला सुरूवात केली. बस आगारासमोर उभ्या असलेल्या रिक्षातील प्रवाशांना उतरवून रिक्षांच्या कागदपत्राची तपासणी केली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.एन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करीत जप्त केलेल्या रिक्षा बस कार्यशाळेत ठेवल्या. शहरातील रिक्षातळ,नल्ला रिक्षा ,खाजगी वाहने व कारवाई केलेल्या रिक्षांचे सांगाडे या बाबत शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)