बलात्कार, हत्येचे आरोपी मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:51+5:302021-07-09T04:25:51+5:30

कल्याण : छेड काढल्याचा जाब विचारल्यामुळे तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली असताना, शनिवारी ...

Accused of rape and murder acquitted | बलात्कार, हत्येचे आरोपी मोकाटच

बलात्कार, हत्येचे आरोपी मोकाटच

कल्याण : छेड काढल्याचा जाब विचारल्यामुळे तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली असताना, शनिवारी कल्याणमध्ये बलात्कार आणि हत्येचा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. मात्र, पाच दिवस उलटूनही या प्रकरणांतील आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. या आरोपींच्या शोधासाठी कल्याण लोहमार्ग पोलीस आणि महात्मा फुले पोलिसांकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. तसेच वर्णनावरून आरोपींची रेखाचित्रेही जारी केली आहेत.

कल्याण पश्चिमेतील रेल्वेच्या पार्सल ऑफिसच्या मागच्या बाजूला रेल्वे कॉलनीत एका मुक्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे ५.३० ला घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पीडित तरुणीकडील मोबाईल हिसकावून पळ काढला आहे. दरम्यान, या घटनेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही आरोपीचा शोध लागलेला नाही. या आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. तर, आरोपींच्या शोधासाठी सहा पथके कार्यरत आहेत.

पाच पथके कार्यरत

कल्याण रेल्वे स्थानकात दुसरी घटना घडली आहे. एका भंगारविक्रेत्याची हत्या दिवसाढवळ्या करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीचे छायाचित्रही पोलिसांकडून जारी केले असून, आरोपीच्या अटकेसाठी पाच पथके कार्यरत आहेत.

----------------

Web Title: Accused of rape and murder acquitted