चार वर्षे धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक; फोटो व्हायरल करण्यासह ठार मारण्याचीही धमकी
By जितेंद्र कालेकर | Updated: April 8, 2024 19:38 IST2024-04-08T19:38:24+5:302024-04-08T19:38:42+5:30
आरोपीला १० एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

चार वर्षे धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक; फोटो व्हायरल करण्यासह ठार मारण्याचीही धमकी
ठाणे: महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरविंद पाल (३५, रा. कैलासनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी सोमवारी दिली. त्याला १० एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील आरोपी अरविंद आणि पिडित महिला हे वागळे इस्टेट भागात वास्तव्याला आहेत. या महिलेच्या कौटूंबिक आणि आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने जानेवारी २०२० ते १८ मार्च २०२४ या कालावधीमध्ये तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.
कालांतराने त्यांच्यातील खासगी फोटो काढून ते समाजमाध्यमांवर टाकण्याचीही तिला त्याने भीती दाखवली. या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर तिला त्याने ठार मारण्याचीही धमकी देत पुन्हर वारंवार जबरदस्तीने तिच्या घरी तसेच उपवन भागातील एका लॉजवर लैंगिक अत्याचार केले. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर पिडितेने याप्रकरणी ७ एप्रिल २०२४ रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह धमकीचा गुन्हा दाखल केला. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेश्मा कदम यांच्या पथकाने आरोपीला अवघ्या काही तासांमध्येच अटक केली.