लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मध्यप्रदेशच्या कडीया सासी या आंतरराज्यीय टोळीच्या आरोपीला तब्बल ११ दिवसांच्या प्रयत्नानंतर अटक करण्यात बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मनवेल पाड्याच्या ओपल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मीनल पाटील (५२) व त्यांचे नातेवाईक हे त्यांची मुलगी साक्षी हिचे लग्नाकरीता २० फेब्रुवारीला रात्री ओल्ड विवा कॉलेज येथे गेले होते. लग्नामध्ये मीनल यांचे मित्र, नातेवाईक यांनी दिलेल्या गिफ्ट, पैसे त्यांनी सफारी कंपनीच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवली होती. सदरची ट्रॉली बॅग कोणीतरी चोरटयाने उघडयावरुन चोरुन नेली होती. बोळींज पोलिसांनी तक्रार आल्यावर २ लाख रुपयांची बंद पाकिटे आणि २ लाख २१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्याची सूचना देण्यात आली होती.
बोळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन लग्न समारंभाच्या ठिकाणचे बाहेरील व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे भारताच्या विविध राज्यात लग्न समारंभामध्ये मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील कडीया, गुलखेडी व हुलखेडी या गावातील कडीया सासी या आंतरराज्यीय टोळीच्या एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. बोळींज गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना होऊन बोडा पोलिसांच्या मदतीने सतत ११ दिवस तपास करून गुन्ह्यातील आरोपी विकासकुमार सिसोदिया (सासी) (३४) याला अटक करून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ७ लाख ९० हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी ५ गंभीर गुन्हे दाखल असून फरार पाच आरोपींचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक किरण वंजारी, विष्णु वाघमोडे, सफौ. जनार्दन मते, पोलीस अंमलदार किशोर धनु, संदीप शेळके, रोशन पुरकर, प्रफुल सरगर, सुखराम गडाख, नामदेव ढोणे, सोहेल शेख आणि एमएसएफ सागर देशमुख यांनी केली आहे.
मॅरेज हॉल चालक मालक व नागरीकांना सुचना
सध्या लन सराईचे दिवस सुरु असुन आपण आपले नातेवाईक व आप्तेष्टांचे लन समारंभाचे वेळी वधू व वरास देण्यात येणारे मुल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडुन आवाहन करण्यात येत आहे.