स्वीकृत अन वृक्ष प्राधिकरण सदस्यांची नावे वादात
By Admin | Updated: April 21, 2017 00:12 IST2017-04-21T00:12:13+5:302017-04-21T00:12:13+5:30
महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ब्रेक लावल्याने त्यामुळे दुखावलेल्या पालिका

स्वीकृत अन वृक्ष प्राधिकरण सदस्यांची नावे वादात
ठाणे :महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ब्रेक लावल्याने त्यामुळे दुखावलेल्या पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीसह स्वीकृत सदस्यांच्या निवडीत खोडा घातल्याची बाब गुरुवारी झालेल्या महासभेच्या निमित्ताने समोर आली. वृक्ष प्राधिकरण सदस्य निवडीचा विषय सर्वसाधारण सभेतून मागे घेतल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांची निवड तांत्रिक आणि कायदेशीर मुद्यांचा आधार घेऊन आयुक्तांनी त्याबाबतची शिफारस करणे टाळले आहे. परंतु, असे असतानाही पीठासीन अधिकारी तथा महापौरांनी स्वीकृत सदस्यांची नावे वाचल्याने आता त्यांच्या पुढील अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे आहेत.
एक ते दीड वर्षापासून पालिका आयुक्तांच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरूआहे. निवडणुकीपूर्वी थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु, मनोरमानगर येथील रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असता, महापौर शिंदे यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर, आयुक्तांनी हे काम तडकाफडकी बंद केले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनात वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अचानक कारवाईला ब्रेक लागल्याने आयुक्त अस्वस्थ झाले होते. मात्र, त्यामुळे हतबल न होता जशास तसे उत्तर देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.
त्यानुसार, पालिकेतील वृक्ष प्राधिकरण आणि स्वीकृत सदस्यपदासाठी २० एप्रिल म्हणजेच गुरुवारी निवड केली जाणार होती. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नगरसेवकांसह तांत्रिक समितीमधील सदस्यपदावरही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची तयारी झाली होती. मात्र, १८ तारखेला अचानक पालिका आयुक्तांनी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य निवडीचा विषय मागे घेऊन राजकीय नेत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर, पाच स्वीकृत सदस्यांसाठी अर्हता कायद्यात नमूद केलेली असून राजकीय पक्षांनी ज्या सदस्यांची नावे सुचवली आहेत. ती या पदासाठी पात्र नसल्याचे प्रशासनाचे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)