प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:33 IST2019-03-13T00:32:46+5:302019-03-13T00:33:05+5:30

अंतिम टप्प्यात धुरळा; मैदाने आरक्षणासाठी लागणार चढाओढ

'Aam Jung' will soon be announced for the campaign | प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राजकीय पक्ष मेळावे आणि बैठकांनाही प्राधान्य देत आहेत. उमेदवार आणि रणनीती ठरल्यानंतर प्रचारसभांसाठी मैदाने मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

लोकसभेच्या कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिसर येतो. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड (यशवंतराव चव्हाण क्रीडांगण), फडके मैदान तसेच पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी मोठी मैदाने प्रचारासाठी आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने विशिष्ठ ठरावान्वये फक्त खेळासाठीच राखीव आहेत. अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी निर्णय घेणार आहे.

कल्याण आणि भिवंडी मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठ्या सभा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहणार आहे. २ एप्रिलनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी करणे, माघार घेणे, उमेदवारांची यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पार पडेल.

साधारण मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मैदान आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. कल्याण मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथमधील नेताजी मार्केट ग्राउंड, गावदेवी मैदान तर उल्हासनगरमधील गोल मैदान, व्हिटीसी ग्राउंड आणि दसरा मैदान ही मैदानेही प्रचार सभांसाठी सज्ज आहेत. परंतु, ती आरक्षित करण्यासंदर्भातही एकही अर्ज अद्यापपर्यंत आलेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील मैदानांसंदर्भात केडीएमसीचे मालमत्ता व्यवस्थापक प्रकाश ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मैदान राखीव करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्ज आलेला नसल्याची माहिती दिली.

प्राधान्यक्रम ठरवणार
मैदाने आरक्षित करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळेल. परंतु, मैदानासाठी ज्याचा अर्ज पहिला येईल त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रोस्टर पद्धतीने मैदाने प्रचार सभांसाठी उपलब्ध होणार आहेत.

मेळावे, बैठकांवर भर
सध्या मेळावे आणि बैठका घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. राष्ट्रवादीतर्फे बुधवारी कल्याण पूर्वेत मेळावा होत आहे. अशा मेळाव्यांसाठी प्रामुख्याने मोठी सभागृहे घेतली जातात.
कल्याण-डोंबिवलीत साधारण १० ते १२ मोठी सभागृहे आहेत. त्यामुळे सध्या ही सभागृहे आरक्षित करण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहील.
मार्च, एप्रिल हा लग्न सराईचा कालावधी पाहता सभागृहांची उपलब्धता हा देखील कळीचा मुद्दा राहणार आहे.

Web Title: 'Aam Jung' will soon be announced for the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.