भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने बुधवारी अठरा वर्षीय युवकाचा बळी घेतला.यश राजेश मोरे ( वय १८ ) रा.मडक्याचा पाडा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.मृत्यूची बातमी परिसरात पासरताच नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरच अम्ब्युलन्स आडवी उभी करून रास्ता रोको आंदोलन केला.दोन अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.अखेर तालुका पोलिसांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
२० जुलै रोजी मडक्याचा पाडा येथे राहणारा युवक यश मोरे वय १८ वर्ष व त्याचा मित्र यश बालाजी घुटे,वय १८,रा.विश्वभाती फाटा असे दोघे सकाळी व्यायाम करण्यासाठी कवाड येथील व्यायाम शाळेत जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून दोघेजण खाली पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते.दोघांवर ठाणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले होते.दहा दिवसांच्या उपचारा नंतर यश मोरे याची प्राणज्योत बुधवारी सकाळी मावळली.या घटने नंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असताना सायंकाळी मृतदेह घरी अंत्यसंस्कारासाठी घेऊन आले असता.
मटक्याच्या पाडा येथे जमा झालेले कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ यांनी खड्ड्यांमुळे आपल्या मुलाचा जीव गेल्याने सर्वांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन सुरू केले.या दुर्दैवी घटनेनंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी सायंकाळी एन गर्दीच्या वेळी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. ज्याचा फटका घरी जाणाऱ्या चाकरमानी विद्यार्थी यांना बसला होता.जोपर्यंत या अपघाती मृत्यूस जबाबदार असणारे ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
या आंदोलनानंतर पोलिस उपअधीक्षक राहुल झालटे,तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे ,स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर मृत यशचे वडील राजेश मोरे यांचा पुरवणी जबाब घेऊन त्यामध्ये रस्त्याचे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नावे गुन्ह्यांमध्ये समाविष्ट केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिली.