अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई
ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदे यांचे साम्राज्य संपविण्यासाठी, तर नवी मुंबईत शिंदेसेनेला भाजप नेते गणेश नाईक यांचे साम्राज्य संपवण्यासाठी एकटे लढायचे आहे. मुंबईमध्ये काँग्रेस नसल्यात जमा आहे. दोन्ही राष्ट्रवादी अस्तित्वहीन आहेत. मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीबद्दल अजून तरी नुसत्याच चर्चा आहेत. जरी उद्धव आणि राज एकत्र आले तरी त्याचा पहिला फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसेल. अशा सुपीक वातावरणात भाजपला मुंबईत २२७ पैकी १६५ ते १७० जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. त्यामुळे कितीही महायुतीच्या गोष्टी होत असल्या तरी प्रत्यक्षात जागावाटपात सगळ्या युती, आघाड्या बिघडतील आणि प्रत्येक जण स्वतःचे बळ आजमावून बघेल, असे आजचे तरी चित्र आहे.
भाजपने ठाणे, नवी मुंबईत स्वबळाची भाषा सुरू केली. आता शिंदेसेनेने देखील तसेच सांगायला सुरुवात केली आहे. नवी मुंबईमध्ये प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांचे राजकारण मोडून टाकण्यासाठी ही मोडतोड केल्याचे दावे होत आहेत. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेसेना हे दोनच पक्ष मैदानात दिसत आहेत. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धवसेना, मनसे या पक्षांची नवी मुंबईत फारशी चर्चाही नाही. लढाई आहे ती गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातच. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे दोन्ही नेते एकत्र बसतात. मात्र नवी मुंबई, ठाण्यात एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटून कार्यकर्त्यांना ‘बळ’ देतात. शिंदेसेनेचे काही नेते गणेश नाईकांचे साम्राज्य उखडून टाकण्यासाठी प्रभागरचनेत बदल केल्याचे सांगतात.
एकट्या नवी मुंबईत १११ वॉर्ड असताना तेथे झालेल्या प्रभागरचनेवर २५०० हून अधिक हरकती आल्या आहेत. एकाच प्रभागात १६ गावांचा समावेश करणे किंवा एकाच गावाचे दोन तुकडे करणे अशा अनेक गोष्टी प्रभागरचनेत घडल्या आहेत. या गोष्टी गणेश नाईक यांना प्रचंड अडचणीत आणणाऱ्या ठरतील. गणपती असो की नवरात्र. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना रात्री-बेरात्री भेटत आहेत. मात्र गणेश नाईक सहजासहजी भेटतच नाहीत, अशी टीका कॉमन आहे. दरबारी राजकारणातून नाईक बाहेर पडलेले नाहीत.
नवी मुंबईत १९९५ पासून प्रभागरचनेवर गणेश नाईक यांचा वरचष्मा होता. मनाप्रमाणे प्रभागरचना करून ते अर्धी लढाई जिंकायचे. एससी, ओबीसी, महिला आरक्षणात सोयीची रचना केली जायची. दुसरीकडे विरोधकही संपवायचे. हीच रणनीती आता शिंदे गटाकडून राबवली जात आहे. नवी मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे २००५ पासून प्रयत्नशील आहेत. २००७ ला विजय चौगुलेंना फोडून त्यांनी पहिला प्रयत्न केला. पण नाईकांनी सेनेचे ८ नगरसेवक फोडून त्यांना मात दिली. मात्र, गेल्या काही वर्षांतल्या मंत्रिपदाचा वापर करून शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. एकेकाळी गणेश नाईक यांचे समर्थक असणारे विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, रामआशिष यादव, किशोर पाटकर, शिवराम पाटील, प्रशांत पाटील, चंद्रकांत आगोंडे, वैभव गायकवाड यांना शिंदे यांनी त्यांच्या पक्षात घेतले आहे.
काँग्रेसचे उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अविनाश लाड, ज्येष्ठ नगरसेवक अंकुश सोनावणे यांच्या हातीही धनुष्यबाण आला आहे. यातील अनेक जण किमान चार-पाच नगरसेवक निवडून आणू शकतात. यातली काही मंडळी शिंदे गटात असली तरी तिथे वाढत चाललेल्या इनकमिंगमुळे त्यांच्यातही अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता गणेश नाईक यांनी वेळीच ओळखून हालचाली केल्या नाहीत तर या निवडणुकीत नाईक अडचणीत येतील, असे त्यांच्या जवळचेही लोक सांगत आहेत. दुसरीकडे गणेश नाईक यांच्या कट्टर विरोधक भाजपच्या मंदा म्हात्रे यांनाही शिंदे यांनी ताकद दिली आहे. नाईक यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी मंदा म्हात्रे सोडत नाहीत.
ठाण्यात भाजपला स्वतंत्र लढायचे आहे. तिथे शिंदे गटाची वाढत असलेली ताकद भाजपच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळेच मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिल्याचे वृत्त आहे. ठाण्यात मात्र उद्धव आणि राज एकत्र आले तर त्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. ठाण्यात उद्धव-राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावज टप्प्यात येण्याची भाजप वाट बघेल. त्यामुळेच शिंदे गटाकडून ठाण्यातही स्वबळाचा नारा दिला जात आहे.
ठाण्यातील १३० पैकी ९० जागा निवडून आणायच्या, असा शिंदेसेनेचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे त्यांना सगळ्या १३० जागा लढवाव्या लागतील. पण तिथे देखील शिंदेसेनेने सर्वपक्षीय इमकमिंग सुरू केले आहे. ते रोखून आपल्या पक्षाला ताकद देण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. नवी मुंबईतून नाईक आणि ठाण्यातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप आमदारांची फौज शिंदेंच्या विरोधात मैदानात उतरली तर आश्चर्य वाटणार नाही.
शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात अडकवून ठेवण्याची भाजपची ही राजकीय खेळी असू शकते. त्यामुळे जवळच्या मुंबईत देखील शिंदे यांना फारसे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. मुंबईत भाजपने अमित साटम यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष भाजपचाच होईल, असे त्यांनी पक्के ठरवले आहे. नवी मुंबईत प्रभागरचनेवरून जे काही राजकारण सुरू आहे त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा आणि किती पायबंद घालणार, यावरही कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश जाणार आहे. बदललेली प्रभागरचना आहे तशीच राहिली तर भाजपने नवी मुंबई एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडली असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल, असे नवी मुंबईतील भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी भाजप कोणती खेळी खेळेल आणि सवयीप्रमाणे गणेश नाईक शेवटच्या काही दिवसांत कोणते फासे टाकतील यावर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरेल. आज तरी ठाणे जिल्हा नव्या राजकारणाची प्रयोगशाळा बनू पाहत आहे हे नक्की.
Web Summary : Thane and Navi Mumbai witness political battles. BJP aims to counter Shinde's influence, while Shinde Sena targets Naik. Alliances are fragile, self-reliance is key, shaping a new political landscape.
Web Summary : ठाणे और नवी मुंबई में राजनीतिक घमासान। भाजपा का लक्ष्य शिंदे के प्रभाव को कम करना, जबकि शिंदे सेना का निशाना नाइक। गठबंधन नाजुक, आत्मनिर्भरता महत्वपूर्ण, एक नया राजनीतिक परिदृश्य बन रहा है।