टेरेसच्या पत्र्यावर अडकलेल्या मांजरीला मिळाले जीवदान
By जितेंद्र कालेकर | Updated: December 15, 2023 17:16 IST2023-12-15T17:16:21+5:302023-12-15T17:16:58+5:30
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली सुटका

टेरेसच्या पत्र्यावर अडकलेल्या मांजरीला मिळाले जीवदान
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या टेरेसवरील पत्र्यावर अचानक अडकलेल्या एका मांजरीची ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करुन तिला जीवदान दिले.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी ९.१७ वाजण्याच्या सुमारास घडला. पांचपाखाडी येथील ठाणे महानगरपालिका मुख्यालय, गेट क्रमांक दाेनजवळ, मुख्यालयाच्या टेरेसवर पत्र्यावर एक मांजर अडकल्याची माहिती सुरक्षारक्षक दिपक ब्रम्हाणे यांना मिळाली हाेती. हीच माहिती त्यांनी तातडीने जवळच्याच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी दोन्ही विभागांनी धाव घेत अवघ्या काही मिनिटात त्या अडकलेल्या मांजराची सुटका केली. सुदैवाने, या घटनेत काेणाला ही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.